मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम १२ टक्के जलसाठा शिल्लक आहे़ पाणीटंचाई व उष्म्यामुळे हैराण मुंबईकर मान्सूनच्या प्रतीक्षेत असताना, या वर्षी अपुरा पाऊस झाला, तरी कृत्रिम पावसाचा प्रयोग न करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे़२००९ मध्ये मुंबईला भीषण पाणीटंचाईशी सामना करावा लागला होता़ पारंपरिक पद्धतीने जमा होणाऱ्या जलसाठ्यावर अवलंबून राहणे धोकादायक असल्याचे समोर आले़ त्यानंतर कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता़ जमीन व हवेतून वरुणराजाला तलाव क्षेत्रांकडे आणण्याचे प्रयोग झाले़ मात्र, करोडो रुपये उडवूनही ‘खोटा’ पाऊस पडल्याचे खात्रीपूर्वक सांगता येत नाही़ अखेर पालिकेने भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्था आणि हवामान तज्ज्ञ जे़आऱ कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला़ त्यांनी पाणलोट क्षेत्रातील १५ वर्षांच्या पावसाच्या परिमाणाचे विश्लेषण करून ढगांच्या बीजीकरणाद्वारे पाऊस पाडण्याची गरज नाही, अशी शिफारस केली आहे़ हा प्रयोगही खर्चीक असल्याने पालिकेने कृत्रिम पावसाचा प्रयोग न करण्याचा निर्णय घेतला आहे़ (प्रतिनिधी )1972 मध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याचा पहिला प्रयोग झाला होता़ मात्र, तेव्हा तंत्रज्ञान विकसित नव्हते़ 2009मध्ये रसायनांचा धूर व विमानातून रसायनांची फवारणी करून कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला होता़मात्र, या प्रयोगामुळे तलाव क्षेत्रात किती पाऊस झाला, याची मोजदाद करण्यासाठी कोणतेच यंत्र नाही़ त्यामुळे या प्रयोगाच्या यशाबाबत साशंकताच आहे़2013मध्ये शहापूर तालुक्यातील तलाव क्षेत्रात ढगांचे बीजीकरण करून खोटा पाऊस पाडण्यात येणार होता़ यासाठी आयआयटीएमला पाचारण करण्यात आले होते़
यंदा कृत्रिम पाऊस बरसणार नाही
By admin | Published: June 15, 2016 3:36 AM