औरंगाबाद : मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी लागणारी तांत्रिक साधने अजूनही शहरात दाखल न झाल्याने प्रयोगाचा मुहूर्त अजून ठरलेला नाही. पावसाच्या प्रयोगाला नेमकी केव्हा सुरुवात होणार, याबाबत शासकीय यंत्रणा ठाममणे सांगण्यास तयार नाही. त्यामुळे हा विषय केवळ गप्पांच्याच पातळीवर अडकला आहे. सी-बॅण्ड डॉप्लर रडार हाँगकाँगमध्ये, तर ढगांमध्ये फोडण्यात येणाऱ्या सोडियम एरोसोल्सच्या सुमारे ८ हजार वर्गीकृत स्फोटक नळकांड्या मुंबई कस्टम आॅफिसने ताब्यात घेतल्या आहेत. ही सर्व यंत्रसामग्री अजून न पोहोचल्याने प्रयोगाबाबत अनिश्चितता आहे. रडार हाँगकाँगमधून भारतात आणण्यासाठी अजून कार्गाे विमान उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे ५ आॅगस्टला कृत्रिम पाऊस पाडण्याबाबतचा महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत झालेला निर्णय प्रत्यक्षात अंमलात येणार नाही. अमेरिकेतून विमान, रडार, तंत्रज्ञ व शास्त्रज्ञ औरंगाबादमध्ये येत आहेत. मात्र त्याचवेळी सीमा शुल्क विभागाने (कस्टम) सोडियमची स्फोटके अडवून ठेवली आहेत. औरंगाबादच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी अतिरिक्त आयुक्तांची भेट घेऊन सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. मंगळवारी फ्लेअर्स (स्फोटके) येथे दाखल होतील, असा दावा विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी केला. वेदर मॉडिफिकेशन कंपनीच्या शास्त्रज्ञांनी विभागीय आयुक्तालयात रडार बसविण्यासाठी तयार केलेल्या सांगाड्याची पाहणी केली. रडार तंत्रज्ञ डॉ. रोनाल्ड राईटहर्ट यांच्या पथकाने दांगट यांच्याशी चर्चा केली. कंपनीला कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी २७ कोटींचे कंत्राट दिले आहे. (प्रतिनिधी)
मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा मुहूर्त ठरेना
By admin | Published: August 04, 2015 1:03 AM