येवला (नाशिक) : कृत्रिम पावसासाठी सकाळीच रॉकेटसह सज्ज असलेली यंत्रणा...पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसलेले हजारो शेतकरी....क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा....ढगांच्या स्थितीचा दर तासाला तंत्रज्ञांकडून घेतला जाणारा आढावा...असा खेळ तालुक्यातील सायगाव येथे दिवसभर सुरू होता. मात्र ढगांच्या लपंडावामुळे नवी मुंबईतील एका संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचा बार रविवारी फुसका ठरला. अपेक्षित मेघांच्या अभावामुळे आर्द्रता ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने रॉकेट आकाशात उडालेच नाही. त्यामुळे साहजिकच पाऊस पडेल या अपेक्षेने आलेले शेतकरी जड पावलांनी निराश होऊन माघारी फिरले.ऐन पावसाळ््यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणाऱ्या येवला तालुक्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी नवी मुंबईच्या इंटरनॅशनल स्कूल आॅफ प्रोफेशनल स्टडीज संस्थेने दाखविली होती. तालुक्यातील सायगाव येथील आर्द्रता व ढगांचे प्रमाण अधिक असल्याच्या अभ्यासावरून या परिसराची निवड करण्यात आली होती. त्यानुसार सकाळी दहा वाजेपासूनच सायगाव येथे पथकाने यंत्रणा तयार ठेवली होती. आमदार छगन भुजबळ यांनीही सायगाव परिसराला भेट देऊन कृत्रिम पावसाच्या कृती कार्यक्रमाबाबत माहिती घेतली. कृत्रिम पाऊस पडेल, या कुतुहलापोटी सायगाव फाट्यावर परिसरातून सुमारे पाच हजार शेतकरी आले होते. गर्दीमुळे पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. २५ तंत्रज्ञांच्या पथकाने प्रत्येकी ७.५ किलो वजनाचे १० रॉकेट तसेच लॉन्चर स्टॅण्ड व सर्व यंत्रसामग्री सज्ज ठेवली होती. दहा वाजेनंतर दर तासाला पथकाकडून ढगांचा अभ्यास केला जात होता. आर्द्रता तपासली जात होती. मात्र ढगांचा लपंडाव सुरू असल्याने तंत्रज्ञांनी आकाशत रॉकेट सोडलेच नाही. आठ तास प्रतीक्षा करूनही अनुकूल ढगांची स्थिती निर्माण झाली नाही. अखेर संध्याकाळी सहा वाजता ‘आॅपरेशन’ थांबविण्यात आले. शेतकऱ्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती, मात्र कृत्रिम पाऊस पडलाच नाही. सिंधुदुर्ग व सांगली जिल्ह्यात यापूर्वी कृत्रिम पावसाचा यशस्वी प्रयोग केल्याची माहिती संस्थेचे प्रमुख अब्दुल रहेमान वान्नो यांनी ‘लोकमत’ला दिली. ७० टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रता व मेघांनी गर्दी केल्यावर मोटारच्या सहाय्याने ४ ते ५ किमी उंचीपर्यंत रॉकेट उडविले जाते. रॉकेट इप्सित स्थळापर्यंत पोहचल्यानंतर एका लॉन्चसाठी ४५ ग्रॅम सिल्व्हर आयोडाईडचे कण ढगात विखुरले जातात व ढगातील तपमान कमी होऊन बाष्पाचे जलकणात रूपांतर होते आणि साधारण ४० ते ४५ मिनिटांनी पाऊस पडतो, असे अब्दुल वान्नो यांनी सांगितले. दरम्यान दिवसभर कृत्रिम पावसासाठी आवश्यक वातावरण निर्मिती झाली नाही. परिणामी संस्थेला हा प्रयोग आवरता घ्यावा लागला. (प्रतिनिधी)
कृत्रिम पावसाचा फुसका बार !
By admin | Published: August 03, 2015 1:03 AM