औरंगाबाद : रंगमंचावर नाटक रंगात आलेले असतानाच मुख्य अभिनेत्याला हृदयविकाराने गाठून झटपट ‘एक्झिट’ घेण्यास भाग पाडले. तापडिया नाट्यमंदिरात बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नाट्य अभिनेता विनायक कृष्णा राणे (५३, रा. मुंबई) यांचा दुर्दैवी अंत झाला. उमद्या कलाकारावर भर प्रयोगात नियतीने टाकलेला कायमचा पडदा रसिकांना हुरहूर लावून गेला.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ५७ व्या महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धेमध्ये ‘जिस लाहोर नहीं देख्या’ या नाटकाचा तापडिया नाट्यमंदिरात प्रयोग सुरू होता. यामध्ये विनायक राणे ‘सिकंदर मिर्झा’ची मुख्य भूमिका साकारत होते. शहरातील रसिकांमध्ये या नाटकाविषयी विशेष उत्सुकता होती म्हणून नेहमीपेक्षा आज गर्दीदेखील जास्त होती.
सायंकाळी ७ वाजता प्रयोग सुरू झाला. सर्व काही सुरळीत चालू असताना सुमारे पाऊण तासाने आपला प्रवेश पूर्ण करून राणे यांनी विंगेकडे धाव घेतली; परंतु तेव्हाच अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने ते विंगेत कोसळले. विंगेतून आरडाओरडा सुरू झाल्यावर रंगमंचावर धावपळ सुरू झाली. सहकाºयांनी त्यांच्या चेहºयावर पाणी शिंपडून शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु ते प्रतिक्रिया देत नसल्याचे लक्षात येताच त्यांना समर्थनगर येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्यांना घाटीत हलविण्यात आले. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले.
‘मैं उसे मरने नहीं दूंगा’मुंबईच्या माझगाव डॉक स्पोर्टस् क्लबतर्फे हे नाटक सादर करण्यात येत होते. भारताच्या फाळणीवर आधारित हे नाटक असगर वजाहत यांनी लिहिलेले आहे. प्रयोग रंगात आला होता. राणे (मिर्झा) आणि सहकलाकार तुषार भरत (पहलवान) यांचा संवाद सुरू होता. पहलवान नाटकातील एका पात्राला मारण्याची धमकी देतो. त्यावर मिर्झा म्हणतात, ‘मैं उसे मरने नहीं दूंगा’. रंगमंचावर अंधार पडतो आणि राणे विंगेकडे जातात. ‘ते सीन करत असतानाच त्यांना त्रास होत असल्याचे जाणवले. मात्र, त्रास होत असतानाही सच्चा अभिनेत्याप्रमाणे त्यांनी प्रवेश पूर्ण केला, असे भरत यांनी सांगितले.
धक्क्यातून सावरणे अवघडराणे मुंबईत एका कंपनीच्या पेंटिंग विभागात कर्मचारी होते. काम सांभाळून त्यांनी रंगभूमीची आवड कित्येक दशके जोपासली. त्यांनी काही टीव्ही मालिका, व्यावसायिक नाटके आणि चित्रपटातही काम केले. नाटकाचे दिग्दर्शक स्वप्नील खोत यांनी सांगितले, ‘ते एवढे ज्येष्ठ रंगकर्मी असूनही त्यांनी कधी त्याचा बडेजाव केला नाही. माझ्यासारख्या नवोदिताना त्यांनी कायम प्रोत्साहन दिले. प्रयोग सुरू होईपर्यंत त्यांची तब्येत व्यवस्थित होती. त्यांच्या जाण्याच्या धक्क्यातून सावरणे अवघड आहे.
पहिल्या प्रयोगातच ‘एक्झिट’गेल्या दीड-दोन महिन्यांपासून ‘जिस लाहोर नहीं देख्या’ या नाटकाची तालीम सुरू होती. बुधवारी रात्री पहिलाच प्रयोग असल्याने राणे व टीम खूप उत्साहित होते; परंतु पहिल्याच प्रयोगात त्यांचा मृत्यू झाल्याने सहकलावंत व रसिकही सुन्न झाले. ‘नाटकाबद्दल चर्चा ऐकून आम्ही आलो होतो. राणे यांचा अभिनय प्रभावशाली होता. त्यांनी अशी ‘एक्झिट’ घ्यावी हे मनाला चटका लावणारे आहे,’ असे प्रयोगाला उपस्थित असलेल्या रसिकांनी सांगितले.