लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विक्रोळी येथील धर्मवीर संभाजी मैदानात ७५ हजार सीडींचा वापर करून ११० बाय ९० फुटांची छत्रपती शिवाजी महाराजांची कलाकृती साकारण्यात आली आहे. ही कलाकृती साकारण्यासाठी सुमारे पाच महिन्यांपासून प्रयत्न करण्यात येत असून, रविवारी ही कलाकृती पाहण्याचा शेवटचा दिवस आहे. येथील प्रवेश सर्वांसाठी मोफत आहे, असे कलाकार चेतन राऊत यांनी सांगितले. शिवाजी महाराजांची कलाकृती साकारण्यासाठी म्हणजेच सीडी जमा करण्यासाठी लॅमिंग्टन रोड आणि चोरबाजारापासून कल्याणपर्यंतच्या बाजारपेठा पालथ्या घातल्या, असे चेतन म्हणाला. आंतरराष्ट्रीय पातळीवर कलेला वाव मिळावा आणि कला क्षेत्रात देशाचे नाव उंचावण्यासाठी येत्या वर्षभरात कलेसंबंधित ५ आंतरराष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट त्याने बाळगले आहे. कलाकृतीसाठी आवश्यक सीडी मिळवण्यासाठी अधिकाधिक विक्रेत्यांच्या संपर्कात होतो. टाकाऊपासून टिकाऊ कलाकृती साकारण्याचे ठरवले होतेच. सोबतच एकेकाळी महत्त्वाच्या असलेल्या, मात्र आधुनिकीकरणात लुप्त होत चाललेल्या गोष्टींचा वापर करण्याचा विचार होता. त्या चौकटीत सीडी ही वस्तू बसली. १ मेपासून कलाकृती प्रत्यक्षात साकारण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र दिन असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरे नाव डोळ्यासमोर आले नाही. म्हणून छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी ही प्रतिकृती साकारण्यात आली. दरम्यान, याआधी चेतनने कॅसेटपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कलाकृती साकारली होती. आधी कॅसेट व आता सीडी यांसारख्या गोष्टींचा वापर करून कलाकृती साकारणारा भारत हा पहिला देश ठरल्याचा दावाही चेतनने केला आहे. ही कलाकृती पाहण्यासाठी सध्या तरी राज्याच्या विविध भागांतून कलाप्रेमी गर्दी करत आहेत. कला दिग्दर्शक नितीन सरदेसाई यांनीही चेतनच्या कलाकृतीला भेट देत शुभेच्छा दिल्या असून विविध क्षेत्रांतील मान्यवर कलाकृतीला भेट देत आहेत.>स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कलाकृती दिल्ली येथे साकारण्याचा संकल्प आहे. मात्र फ्रान्स, इटली यांसारख्या देशांप्रमाणे आपल्या देशात कलाकृती साकारण्यास व्यासपीठ उपलब्ध नसल्याची खंत चेतनने व्यक्त केली आहे.
सीडीमधून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची कलाकृती
By admin | Published: May 14, 2017 1:43 AM