- यशवंत देवअरुण दाते यांचा व माझा संबंध बऱ्याच वर्षांचा होता. विशेषत: माझ्या चाली व त्यांचा आवाज हे एकत्र जुळून आले होते. अशीच एक कविता होती, मंगेश पाडगावकर यांची अगदी सुरुवातीच्या काळातली. ती कविता मी संगीतबद्ध केली होती, परंतु तिला अरुण दातेंचा आवाज नव्हता. कारण मंगेश पाडगावकर यांची व माझी ओळख त्या आधीची होती, परंतु अरुण दातेंशी तेव्हा माझी भेट झालेली नव्हती. तेव्हा ते इंदूरला राहात होते. अरुण दातेंची आणि त्यांच्या आवाजाची ओळख मला त्या मानाने उशिराच झाली. ही ओळख नंतर झाली खरी, पण जेव्हा ती झाली, तेव्हा फार दृढ झाली, हा भाग निराळा. दातेंचा आवाज हा फक्त त्यांचाच होता, दुसºया कुणाचा नव्हता. हे त्यांच्या गायकीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यांनी कधी कुणाच्या आवाजाची नक्कल केली नाही आणि तशी ती करण्याची त्यांना गरजही नव्हती. त्यांचा आवाज अतिशय रेशमी होता. स्त्रिया जेव्हा रेशमी वस्त्रे पांघरतात, तेव्हा त्यात एक प्रकारचे वेगळेपण दिसते. तसा त्यांचा आवाज होता. मात्र, त्यात पुरुषीपणा होता. अजूनही ते ठणठणीतपणे गाऊ शकत होते आणि हे सगळे सहज होते, मुद्दाम गाण्यासाठी वगैरे नव्हे. त्यांच्या आवाजात सहजता होती. त्यांनी आयुष्यात जे काही केले ते अगदी सरळ सरळ केले. त्यांनी मुद्दाम असे कधीच काही केले नाही.(शब्दांकन : राज चिंचणकर)
अरुण दातेंचा आवाज हा फक्त त्यांचाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 4:45 AM