पाडगावकर , पु.लं. आणि अरुण दाते हे त्रिकूट अत्यंत मिश्किल होते. त्याचा एक किस्सा असाच भन्नाट आहे. एकदा पाडगांवकर पु.ल.ंना म्हणाले अरे आज आपल्या अरुच्या गाण्याचे रेकॉर्डींग आहे. त्यावर पु.ल. म्हणाले हो. आज कृष्णाकल्लेच्याही गाण्याचे रेकॉर्डींग आहे. तेव्हा जायला हवे. त्यावर दाते म्हणाले म्हणजे काय? त्यावर पु.ल. म्हणाले कृष्णाकल्ले म्हणजे एकदम सुंदर, तिला बघण्यासाठी तिचे रेकॉर्डींग असलेले की अनेक जण गर्दी करतात म्हणून मी मंगेशाला म्हणालो. त्यानुसार दाते, पाडगांवकर, पु.ल. हे स्टुडिओत दाखल झाले. पु.लं.च्या लक्षात आले की, पाडगांवकर हे सारखे कल्लेंकडे एकटक पाहत होते. बाहेर आल्यावर पु.ल. गमतीने म्हणाले मंगेशा आता तुझी दाढी काढून टाक, आणि कल्ले वाढवायला सुरूवात कर त्यावर उसळलेला हशा आजही सगळ्यांना आठवतो आहे.पु.लं.चे आणि सुनिताबार्इंचे दातेंवर नितांत प्रेम. पुण्यातल्या एका सोहळ्यात अनेक गायक गायलेत. कार्यक्रम संपल्यावर सुनिताबाई आणि पु.ल.अरुणजवळ आलेत आणि म्हणालेत अरुण अप्रतिम गायलास. त्यावर सुनिताबाई म्हणाल्या याच कारण तुला माहित आहे? दातेंनी नकारार्थी मान हलवली. सुनिताबाई म्हणाल्या सगळे गाणी गायले आणि तू कविता गायलास. म्हणून तुझं गाण अप्रतिम झाले.एकदा दाते रेकॉर्डींगच्या धावपळीत होते. पु.ल.नी विचारले, काय रे, आज कसली एवढी गडबड आहे? त्यावर ते म्हणाले आत्ता माझ्या भक्तीगीताचे रेकॉर्डींग आहे. पु.ल. चकीत होऊन म्हणाले अरे एवढा चांगला भावगीत गायक तू, मध्येच भक्तीगीत कसा काय गायला लागलास? त्यावर दाते म्हणाले अहो, परवाच एक टीकाकार म्हणाला, की दातेंनी फक्त भावगीतेच गावीत. त्यांना भक्तीगीत गाता येणार नाहीत. तो त्यांचा प्रांत नाही. त्यानंतर मी यशवंत देवांना आग्रह करून एक भक्तीगीत माझ्यासाठी रेकॉर्ड करायला सांगितले आहे. त्यावर पु.ल. खवचटपणे म्हणाले, अरे अरुण हे टीकाकार म्हणजे बोहोरणीसारखे असतात. बोहोरणीला कसे अगदी अंगावरची नुकतीच सोडलेली लाखभर रुपयाची पैठणी जरी दिली तरी ती म्हणणार, बाई याच्यापेक्षा जरा काही वेगळं असेल तर दाखवा ना? त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस, परंतु दातेंनी त्या भक्तीगीतांचे रेकॉर्डींग केले. ते होते‘अविरत ओठी यावे नाम,श्रीराम जयराम जयजय राम’दातेंवर कुसुमाग्रजांचाही खूप लोभ होता. मराठीतल्या गाजलेल्या कवींची एकेक कविता स्वरबद्ध करून त्याचा एक अल्बम करावा अशी योजना अरुण दातेंचे पुत्र अतुल दाते यांनी हाती घेतले. त्यामध्ये‘काही बोलायचे आहे, पण बोलणार नाहीदेवाजिच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही’ही कविता घेतली होती. आता प्रत्येक कविला त्याचे मानधन देऊन मगच या कवितांचा वापर करायचा अतुलचा निर्धार होता. त्यासाठी त्याने सगळ्या कवींच्या भेटी घेऊन त्या प्रत्येकाला मानधन देण्याचे ठरविले होते.असे मानधन देऊन अनुमती घेण्यासाठी अतुल कुसुमाग्रजांच्या घरी एके दिवशी सकाळीच दाखल झाला. अतुल दाते आले आहेत. असा निरोप त्याने पाठविला. त्यावेळी तात्यांकडे बरीच मंडळी आलेली होती. बोलावतो असा निरोप तात्यांनी पाठविला. काही वेळ झाल्यावर तात्यांच्या लक्षात आले की, अतुल हा अरुण दातेंचा चिरंजीव आहे. ते आपणहून बाहेर आलेत. त्यांनी त्याला आलिंगन दिले. अरे, तू रामूभैय्यांचा नातू आणि अरुणचा चिरंजीव हे सांगायचे नाही काय?नुसतेच अतुल दाते आले आहेत असा निरोप पाठविलास? माझ्या लक्षात नाही आले. बोल काय काम काढलस?असे त्यांनी विचारल्यानंतर अतुलने आपले येण्याचे प्रयोजन सांगितले. त्यावर तात्या म्हणाले, राजा तुझ्या आजोबांनी आणि वडिलांनी रसिकांना, भारतीय संगीताला इतके भरभरून दिले आहे की त्यांच्या नातवाने, पुत्राने हाती घेतलेल्या सत्कार्याचे काय मानधन आम्ही मागावे. मानधन वगैरे काहीनाही. तुला त्या कवितेचा जो काही आणि जसा काही वापर करायचा असेल तो कर. त्यावर अतुलने सांगितले जी कंपनी हा अल्बम काढणार आहे तिला कायदेशीर बाबी म्हणून तुमची लेखी अनुमती लागणार आहे. तेव्हा तात्यांनी एका कागदावर परमिशन ग्रँटेड असे लिहून दिले. हा किस्सा जेव्हा अरुण दातेंना कळाला त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते.दातेंची कृतज्ञताकृतज्ञेचे दुसरे रूप म्हणजे अरुण दाते. असे आजही गीत आणि संगीताच्या क्षेत्रात बोलले जाते. त्यात तसूभरही अतिशयोक्ती नाही. मराठी भावगीत गायनाची परंपरा सुरू करणाऱ्या जी.एन. जोशी यांचा ८५ वा वाढदिवस पदरचे ८५ हजार रुपये खर्चून साजरा करण्याची दिलदारी फक्त अरूण दातेच दाखवू शकतात. जेव्हा दाते हे बिर्ला उद्योग समूहातील एका मोठ्या कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून निवृत्त झाले तेव्हा त्यांना पीएफ, ग्रॅच्युईटी याची मोठी रक्कम मिळाली तेव्हा श्रीनिवास खळे, यशवंत देव आणि मंगेश पाडगांवकर या प्रत्येकाला त्यातल्या एकेक लाख रुपयाचा चेक घरी जाऊन देण्याचे दातृत्व फक्त अरुण दातेच दाखवू शकतात. या तिघांमुळे मी जो काही आहे तो आहे. त्यांच्याशिवाय माझे अस्तित्व शून्य आहे. असे ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सांगत होते.गाणे चुकवून झाले मोठेअसं म्हणतात, की एखादी कलाकृती तिच्या निर्मात्याला चुकवून मोठी होते. असे अनेक कलावंतांच्या बाबतीत घडत. तस ते दातेंच्या बाबतीतही घडल होत.‘भातुकलीच्या खेळामधलीराजा आणिक राणी’या गीताचे रेकॉर्डींग करायचे ठरले.परंतु ही चाल अत्यंत बाळबोध आहे ती रसिकांना फारशी रुचणार नाही. व हे गाणे लोकप्रिय होणार नाही उलट असे दाते आणि पाडगांवकर यांना वाटत होते. परंतु यशवंत देव यांनी मात्र हे गाणे याच चालीत रेकॉर्ड करायचे ते अत्यंत लोकप्रिय होईल. आपल्या तिघांच्या ही कारकिर्दीतील माईल स्टोन ठरेल. असा ठाम पवित्रा घेतला होता. त्यामुळे दाते पाडगावकर एकीकडे आणि देव दुसरीकडे असा संघर्ष निर्माण झाला त्यावर देव म्हणाले मी वयानी आणि अनुभवानी तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे आणि शिवाय देव आहे. त्यामुळे माझे तुम्ही ऐका. आपण याच चालीत या गीताचे रेकॉर्डींग करू, मग तुम्हाला कळेल बरोबर कोण होत. शेवटी दाते आणि पाडगांवकर यांनी त्याला संमती दिली आणि पुढे या गीताने घडविलेल्या इतिहासाचे आपण साक्षीदार आहोत.बीबीसीत झाले रेकॉर्डींगबीबीसीच्या लंडनमधील स्टुडिओत आजवर फक्त दोनच मराठी भावगीतांचे रेकॉर्डींग झाले. आणि ती दोनही भावगीत अरुण दातेंनी गायलेली होती. एक होते शुक्रतारा.....! आणि दुसरे होते भातुकलीच्या खेळामधली .......! त्याचे असे झाले की, ब्रिटनमध्ये शुक्रताराचे कार्यक्रम होत होते. त्याकाळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व.पु. काळे हे करीत असत. तबल्यावर अरुण यांचे काका शामूभैय्या दाते हे साथ करीत असत. त्याकाळी विमानप्रवास खूप महाग होता त्यामुळे एक सूत्रसंचालक आणि एक हार्मोनियम वादक असे दोन जण नेणे शक्य नव्हते. म्हणून अरुण यांच्यावरील प्रेमापोटी व.पु. स्वत: हार्मोनियम शिकले आणि ते त्यांना साथ करू लागले. बीबीसीच्या वार्ताहरांनी शुक्रताराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून चमत्कार पाहिला की, एक तबलजी आणि एक हार्मोनियमवादक यांच्या साहय्याने हा गायक भावगीत गातो आणि हजारो श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकतो हा चमत्कार त्यांनी ध्वनी चित्रफितीत बद्ध करण्यासाठी या तिघांनाही आपल्या स्टुडिओत बोलाविले आणि या दोनही गीतांचे रेकॉर्डींग केले. एवढेच नव्हे तर या रेकॉर्डींगचे उत्कृष्ट दर्जाचे क्लिपींग त्यांनी दातेंना पाठविले. ते आजही त्यांच्या संग्रही आहे.लतादीदींनी त्यांच्या आजवरच्या पार्श्वगायनाच्या ६० वर्षांच्या काळात एकच मराठी युगल भावगीत गायले. ते म्हणजे संधीकाली या अशा धुंद या दिशा दिशा आणि ते अरुण दातेंसमवेत गायल्यात. आता या गीताच्या रेकॉर्डींगच्या वेळी मोठी मौज घडली. दाते सहा फूट उंच तर लताबाई त्या मानाने ठेंगण्या. त्याकाळी एकच माईक असायचा. त्याच्या एका बाजूने गायक व दुसºया बाजूने गायिका असायची. व ते तोच माईक वापरायचे. कितीही प्रयत्न केला तरी दोघांच्यात उंचीची आणि माईकची लेव्हल अॅडजेस्ट होत नव्हती. शेवटी लताबार्इंना एका स्टूलावर उभे करण्यात आले.एकदाच गायिले दुस-याचे गाणेशुक्रतारामध्ये आणि अन्य इतरही कार्यक्रमात अरुण दाते हे फक्त आपण गायलेली गीतेच गायिले याला अपवाद फक्त एकाच गीताचा आणि प्रसंगाचा होता. तलत मेहमूद यांचा आवाज आणि अरुण दाते यांचा आवाज हा बºयाच अंशी एकसारखा होता. त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ ‘जलते है जिसके लिए’हे गीत तलत यांच्याच आग्रहावरून अरुण दाते यांनी गायिले .
- मानसी देशमुख, नाशिक(लेखिका या दाते कुटुुंबियांच्या निकटवर्ती आणि नाशिकच्या दांडेकर टेक्निकल इंन्स्टीट्युटच्या प्राचार्या व सचिव आहेत)