ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - केईएमचे डीन डॉ. अविनाश सुपे आणि अरुणा यांच्या भाच्याने दिला मुखाग्नी. भोईवाडा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले.
गेली ४२ वर्ष कोमात असलेल्या अरुणा शानबाग यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून शानबाग यांची प्रकृती अत्यवस्थ होती. सोमवारी सकाळी साडे आठच्या सुमारास शानबाग यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेली ४२ वर्षे अरुणा यांच्यावर केईएम रुग्णालयातील ४ ए वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. १९७३ मध्ये रुग्णालयातील वॉर्डबॉयने केलेल्या लैंगिक अत्याचारानंतर शानबाग कोमामध्ये गेल्या होत्या. त्यांच्या मेंदूच्या काही भागास होणारा रक्तपुरवठा खंडित झाला. यामुळे त्यांचे काही अवयव आणि संवेदना निकामी झाल्या होत्या. सध्या रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका मिळून अरुणा यांची काळजी घेत होत्या. शानबाग प्रकऱणानंतरच भारतात इच्छा मरणाची मागणी जोर धरु लागली व याप्रकरणी थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने इच्छा मरणाची याचिका रद्द केली होती. शानबाग यांच्यावर अत्याचार करणारा नराधम वॉर्डबॉय शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेरदेखील आल्याने अनेक सामाजिक संघटनांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांपासून अरुण शानबाग यांची प्रकृती खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते.