ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ : सध्याची तीन वर्षांची कारकिर्द सप्टेंबरमध्ये संपल्यानंतर पुन्हा त्याच पदावर नियुक्त होण्यात आपल्याला स्वारस्य नाही, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी स्पष्ट केल्यानंतर त्यांचे उत्तराधकारी कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानंतर नव्या गव्हर्नरपदासाठी डझनभर नावे चर्चेत आली. त्यात डेप्युटी गव्हर्नर ऊर्जित पटेल, कॅगचे माजी प्रमुख विनोद राय आणि एसबीआयच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांची नावे आघाडीवर होती. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार एसबीआयच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांचे नाव निश्चित झाले असल्याचे समजते. त्यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदी नियुक्ती झाल्यास त्या पहिला महिला गव्हर्नर ठरतील.
भारतातील सर्वांत मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकर म्हणून भट्टाचार्य प्रख्यात असून २०१५ आणि २०१६ अशा सलग दोन्ही वर्षी फोब्रर्जच्या शक्तिशाली महिलांच्या यादीत भट्टाचार्य यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला आहे. राजन यांनी २०१३ मध्ये २३ वे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला होता. राजन नंतर भारताच्या २४ व्या गव्हर्नर म्हणून अरुंधती भट्टाचार्य यांची निवड निश्चित मानली जात आहे.
भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राजन यांच्या धोरणांवर सातत्याने हल्ले चढवले होते. व्याजदराबाबतच्या राजन यांच्या सक्तीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले, अशी टीका स्वामी यांनी केली होती. राजन यांच्याकडे अमेरिकी ग्रीन कार्ड असल्यामुळे त्यांची वैचारिक बैठक पूर्णत: भारतीय नसल्याचा आरोपही स्वामींनी केला होता. स्वामी यांच्याकडून राजन यांच्यावर जाहिरपणे टीकास्त्र सोडले जात असतानाच केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सार्वजनिक टीका करता संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. तर राज्यसभेवर नुकतेच नामनिर्देशित झालेल्या खासदारांची टिप्पणी त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले होते.
राजन यांनी मुदतवाढ स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नव्या गव्हर्नरची लवकरच निवड करण्यात येणार असल्याची घोषणा केल्यानंतर नवे गव्हर्नर कोण असतील, याची जोरदार चर्चा सुरू आहे. एसबीआयच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांचा पदाचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपत आहे.