Arvind Kejriwal Manish Sisodia: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी विधानसभेत भाषण करताना मनीष सिसोदिया यांची पाठराखण करत भाजपावर टीकास्त्र सोडले. आपल्या भाषणात मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांचे कौतुक केले आणि केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. मनीष सिसोदिया यांनी कोणताच घोटाळा केलेला नाही हे सत्य आहे आणि त्यामुळेच सर्व आरोप खोटे आहेत, असा दावा केजरीवाल यांनी केला. तसेच, १४ तास गाद्या-उश्या फाडूनही सीबीआयला साधे आठ अणेही मिळाले नाहीत, अशा शब्दांत त्यांनी खिल्ली उडवली.
"जगात दिल्ली सरकारचीच चर्चा होत आहे. मनीष सिसोदिया हे जगभर देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. पण देशाच्या प्रगती ज्यांच्या डोळ्यात खुपते, ते लोक मनीष सिसोदिया यांचा तिरस्कार करत असून त्यांच्या विरोधात कट रचत आहेत. भाजपाच्या लोकांनी दिल्ली सरकार पाडण्याचा कट रचला. दिल्लीच्या शिक्षण व्यवस्थेचे परदेशात कौतुक होत आहे, असे असताना देशात काही लोक त्यांच्याविरोधातच कट रचत आहेत. पण दिल्लीत जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत आमचे मंत्री असेच चांगले काम करत राहतील", असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला.
मनीष सिसोदिया यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले. मनीष सिसोदिया यांनी काय घोटाळा केला, असे मी विचारले असता, तर त्यांनी दीड लाख कोटींचा दारू घोटाळा केला असे उत्तर मिळाले. सीबीआयने केलेल्या FIR मध्ये १ कोटींचा घोटाळा झाल्याचे लिहिले आहे. पण घोटाळा म्हणजे काय याचे उत्तर भाजपाकडे नाही. कारण कोणताच घोटाळा झाला नाही हे सत्य आहे आणि त्यामुळेच सर्व आरोप खोटे आहेत", अशा शब्दांत केजरीवालांनी कारवाईची खिल्ली उडवली.
"मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. सीबीआय अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर ठिकठिकाणी छापे टाकले. दिवसभर छापा टाकूनही त्यांना आठ आणेही मिळाले नाहीत. १४ तास गाद्या, उशा फाडून देखील सीबीआयला साधी चार आणेही मिळाले नाहीत. ३०-३५ लोक आले होते, त्यांचा जेवणाचा खर्चही लालफितीत निघाला नाही. ७-८ दिवस झाले पण अजूनही काय झाले ते त्यांना कळले नाही. संपूर्ण छापा बनावट होता", असा दावाही केजरीवाल केला.