बुलढाणा- जिजाऊ जन्मोत्सव दिनी , १२ जानेवारी २०१८ रोजी सिंदखेडराजा या जिजाऊच्या जन्मस्थळी आपचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत संकल्प सभेचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र सरकारच्या राजकीय दबावामुळे, स्थानिक पोलीस यंत्रणेने दोन दिवसांपूर्वी या सभेस परवानगी नाकारली होती. परंतु यानंतर स्थानिक कार्यकर्ते दोन दिवस पोलीस स्टेशनवर ठिय्या देऊन होते. राज्यभर याचे पडसाद माध्यमांमधून उमटल्यावर काल संध्याकाळी उशिरा पोलीस परवानगी देण्यात आली.मागील वर्षभर महाराष्ट्रात शेती, आरोग्य, शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रात अस्वस्थता आहे. विकास खुंटला आहे. त्याच बरोबर विविध समाजातील असलेल्या असंतोषाला मोठ्या जनमोर्च्यांनी वाचा फोडली आहे. शेतीचे आणि शेतमालाच्या भावाचे प्रश्न पुढे आले आहेत. या सर्वच आघाड्यावर भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. दुसरीकडे निष्क्रिय कॉंग्रेस आणि तडजोडीचे राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादी, शिवसेना या प्रस्थापित पक्षांकडूनही अपेक्षाभंग झाला आहे. 'नाही रे' वर्गातील अस्वस्थता वर्षारंभी झालेल्या दंगलीतून बाहेर आली आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी महाराष्ट्राच्या राजकारणात पाऊल टाकत आहे.दिल्लीत सत्तेत येताना रिक्षा ड्रायव्हर, असंघटीत कष्टकरी, वंचित समाज, अल्पसंख्याक या सोबत सुशिक्षित आणि उच्चशिक्षित वर्गानेही आप ला पाठींबा दिला होता. त्यानंतर सत्तेत आलेल्या आप सरकारने शिक्षण, वीज, पाणी, आरोग्य या क्षेत्रात दमदार कामगिरी केली आहे. जनतेच्या मुलभूत प्रश्नांना हात घालण्याचा मार्ग महाराष्ट्रातही अवलंबला जाईल. त्यामुळेच शेतीप्रश्नाने अडचणीत आलेल्या मराठवाडा भागात या सभेची सुरवात होत असून ग्रामीण व शहरी वर्गास एकत्र घेऊन पुढे जाण्याचे आप चे धोरण आहे.खडसे, भुजबळ आणि इतर अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणाऱ्या आप च्या महाराष्ट्रातील प्रवेशाने राष्ट्रवादी आणि भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्याची सुरवात सभेला परवानगी नाकारण्याने झाली होती. आता १२ जानेवारी रोजी केजरीवाल यांच्या उपस्थितीत होणार्या सभेविषयी सामान्य जनतेच्या मनात उत्सुकता असून आम आदमी पार्टी जनतेच्या मूलभूत अपेक्षा आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या आकांशाचे स्वप्न घेऊन महाराष्ट्रात येत आहे. या सभेनिमित्ताने माजी खासदार ब्रिगेडिअर सावंत त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांबरोबर तसेच अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, सनदी अधिकारी आपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.
आपचे अरविंद केजरीवाल यांच्या महाराष्ट्र संकल्प सभेला अखेर परवानगी !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2018 4:48 PM