ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी गेल्या २६ दिवसांपासून आर्थर रोड तुरुंगामध्ये असलेल्या आर्यन खानचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने गुरुवारी मंजूर केला. त्यामुळे त्याचे वडील बॉलीवूड सुपरस्टार शाहरूख खान यांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे या प्रकरणावरून सुरू असलेली आरोप-प्रत्यारोपांची मालिका कायम असून ‘अभी पिक्चर बाकी है,’ असे म्हणत अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे समीर वानखेडे यांना पुन्हा एकदा आव्हान दिलं होतं. आर्यन खानच्या जामिनानंतर शुक्रवारी नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत निरापराध व्यक्तीला तुरुंगात डांबणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले.
"आता परिस्थिती संपूर्णत: बदलली आहे. पिक्चर अभी बाकी है, संपूर्ण सिक्वेन्सच आता बदलला आहे. धरपकड करणारे लोकं आता बचावाचा मार्ग शोधत आहेत, म्हणूनच मी काल पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असं म्हटलं." असं नवाब मलिक म्हणाले. "जी व्यक्ती आर्यन खानला तुरूंगात घेऊन जात होती ती आज तुरुंगात आहे. २ तारखेनंतर परिस्थिती बदलली आहे. जी व्यक्ती आर्यन खानला जामीन मिळू नये म्हणून शक्ती पणाला लावत होती, ती काल कोर्टात दाद मागत होती. पोलिसांनी आता चौकशी सुरू केली आहे. ती सीबीआयकडे किंवा एनसीबीकडे वर्ग करण्याची मागणी ते करत होते," असंही ते म्हणाले.
"जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत निरपराध व्यक्तीला तुरूंगात डांबणं चुकीचं आहे. काल तीन लोकांना जामीन मिळाला. वानखेडे हे एनसीबीत आल्यानंतर अनेक लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरूंगात डांबलं. एका महिन्याच्या आत अनेक गोष्टी बदलत आहेत," असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. "वानखेडे यांनी सर्व पर्यायांचा वापर केला. माझ्या कुटुंबाला याच्या मध्ये आणण्यात येत असल्याचे ते यापूर्वी म्हणाले. त्यांनी मी त्यांच्या आईचं नाव या प्रकरणात घेतल्याचं म्हटलं. परंतु मी त्यांचं नाव कधीही यात घेतलं नाही. मी त्यांच्या पहिल्या पत्नीचा फोटो ट्विटरवर टाकला परंतु त्यांच्या दुसऱ्या पत्नीबद्दल काहीच बोललो नाही. माझी लढाई कोणाच्या कुटुंबीयांविरोधात नाही, तर अन्यायाविरोधात आहे," असंही मलिक म्हणाले.