Eknath Shinde on Devendra Fadnavis Resignation, Lok Sabha Election Result 2024 लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर आज राज्यातील भाजपामध्ये मोठी घडामोड घडली. गेल्या लोकसभा निवडणुकीत २३ जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा मात्र अवघ्या नऊ जागांवर समाधान मानावे लागेल. या पार्श्वभूमीवर आज भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. "विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटनेचे पूर्ण वेळ काम करण्यासाठी मला सरकारमधील जबाबदारीतून मुक्त करावे, अशी मागणी मी पक्षनेतृत्वाकडे करणार आहे," अशी माहिती फडणवीस यांनी दिली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
"निवडणुकांमध्ये हार-जीत होत असते. मुंबई आणि महाराष्ट्रात जर आपण नीट पाहिले तर मतांची टक्केवारी सारखीच आहे, फक्त जागा कमी जास्त झाल्या आहेत. २ लाख मते आम्हाला जास्त मिळाली होती. पण तरीही यश-अपयश ही आमची सामुहिक जबाबदारी आहे असे आम्ही समजतो. आम्ही टीम म्हणून काम केलं आहे. आम्ही तिन्ही पक्षांनी राज्यात चांगले काम केले आहे. यापुढे आम्ही एकत्रच काम करत राहू," अशा शब्दांत शिंदे यांनी फडणवीसांची पाठराखण केली.
"एका निवडणुकीने सगळं काही संपत नसतं. आम्ही एका निवडणुकीत हार-जीत झाल्याने खचून जाणारे लोक नाही. फडणवीसांनी भावना नक्कीच व्यक्त केल्या असतील. पण आम्ही टीम म्हणून काम करतच राहणार. मी नक्कीच देवेंद्र फडणवीसांशी बोलेन. जो निकाल आला आहे ती सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे. कुणा एकट्याची जबाबदारी नाही, त्यामुळे मी फडणवीसांशी नक्कीच चर्चा करणार आहे," असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
"या निवडणुकीत ज्या ज्या ठिकाणी आमचा पराभव झाला त्याचा आमचा विचार करणार आहोत. त्याबाबत आम्ही नक्कीच आत्मचिंतन करू. मतदारांमध्ये संविधान बदलण्याचा चुकीचा प्रचार करण्यात आला आणि संभ्रम पैदा करण्यात आला. भीतीच्या आधारावर मत मागण्याचा प्रकार मविआ आणि इंडिया आघाडीकडून करण्यात आला. पण हा सगळा प्रकार तात्पुरता आहे, या प्रभाव हळूहळू कमी होईल आणि या लोकांचा खरा चेहरा नक्कीच मतदारांच्या समोर उघड होईल. आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे चालत आहोत. आम्ही व्होटबँकेचे राजकारण करणार नाही. आमचा भर विकासावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या जनतेने NDAला पाठिंबा दिला," असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.