जळगाव - जर बहिणींच्या कल्याणासाठी काम करताना माझं बरंवाईट झालं तरी मला पर्वा नाही. गेल्या ३३ वर्षापासून मी जनसेवेला समर्पित केले आहे. मी ते करत राहीन. जर हेच माझ्या नशिबात असेल, माझं भाग्य असेल तर माझा जीव गेला तरी या महानभूमीतील लोकांच्या मायमाऊलीच्या सेवेत काम करताना मरण पत्करावं लागलं तरी मला अभिमान वाटेल असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले आहे.
जळगाव येथे जनसन्मान यात्रेच्या भाषणात ते बोलत होते. अजित पवार म्हणाले की, काल मी नाशिकला आलो तेव्हा गुप्तचर विभागाने माझ्या जीवाला वाढलेल्या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली. या बातम्याही पसरल्या. मलाही काही हिंट त्यांनी दिली. मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत तिथे जाताना काळजी घ्या अशा सूचना मला करण्यात आल्यात असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय मी जनसेवक आहे. गेली ३५ वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतोय. चांदा ते बांदा फिरलोय. गडचिरोलीच्या दुर्गम भागातही मी गेलो आहे. माझ्या मुलींनी, बहिणींनी, महिलांनी, मायमाऊलींनी बांधलेल्या राख्या माझ्या हातावर आहेत. शेकडो राख्या महिला भगिनी मला बांधत असतात. गुप्तचर विभागाने मला मालेगाव, धुळे यासारख्या ठिकाणी गेल्यावर माझ्या जीवाला धोका असल्याचं सांगितले. पण माझ्या हाताला माझ्या बहिणींकडून बांधलेल्या राख्या आहेत तोपर्यंत दुसऱ्या संरक्षणाची गरज नाही. त्यात माझ्या बहिणींचे माय माऊलींचे आशीर्वाद राखीचं सुरक्षा कवच आणि प्रेमाची ढाल असल्याने कोणताही धोका मला स्पर्श करू शकत नाही याचा मला ठाम विश्वास आहे असंही अजित पवारांनी म्हटलं.
...अन् अजितदादांनी एसपींना आदेश दिलेत
अजित पवार भाषण करताना एका महिलेने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ताई, तुमचं काय म्हणणं असेल त्याचे निवेदन द्या, तुमचं काम होणारं असेल तर आजच मी करतो असं अजित पवार व्यासपीठावरून बोलले. त्यानंतर या महिलेचं निवेदन अजितदादांना प्राप्त झालं. यात संबंधित महिला आणि तिच्या कुटुंबाला स्थानिक गुंडाकडून त्रास होत असल्याचा आरोप होता. त्यात पोलीस दखल घेत नसल्याची खंत होती. त्यावरून अजित पवारांनी भाऊ या नात्याने मी तुम्हाला मदत करेन. जर खरेच तुमच्यावर काही अन्याय झाला असेल तर तुम्हाला न्याय दिला जाईल असं सांगत अजित पवारांनी या महिलेला संरक्षण आणि तिच्या तक्रारीवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना दिले.