सोलापूर : आज आमलिका एकादशी निमित्त श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या देव्हारा, गाभारा, चौखांबी, सोळाखांबी मध्ये १ टन द्राक्ष वापरून मनमोहक अशी आरास करण्यात आली. या सजावटीमुळे मंदिर परिसर आज सुंदर अन् मनमोहक दिसत होते.
विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने प्रत्येक एकादशीला मंदिरात विविध प्रकारची सजावट करण्यात येते. यासाठी भाविक मोठया प्रमाणात पुढे येतात. एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल झाले आहेत. मंदिर परिसरातील रस्ता भाविकांनी खुलून गेला आहे. वाढत्या उन्हामुळे सकाळच्या सत्रात दर्शनासाठी मोठी गर्दी होती. दुपारनंतर दर्शनरांगेत गर्दी कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, पुणे आणि बारामती येथील भाविक बाबासाहेब रामचंद्र शेंडे, पूनम बाबासाहेब शेंडे आणि सचिन आण्णा चव्हाण यांनी या द्राक्ष सजावटीची सेवा दिली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा देव्हारा, गाभारा, चौखांबी, सोळाखांबी द्राक्षांनी सजवण्यात आला आहे. द्राक्षांची ही आकर्षक सजावट भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे. आमलिका एकादशीचं औचित्य साधून केलेली ही मनमोहक सजावट विठ्ठल भक्तांसाठी अनोखी भेट ठरली आहे.