सुनील चावके, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नेतृत्व बदलण्याचा विचार करेपर्यंत प्रदेश काँग्रेसशी, मित्रपक्षांशी करावयाच्या आघाडीशी तसेच निवडणुकांशी संबंधित सर्व महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष तसेच पक्षाच्या विधिमंडळातील गटनेत्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करावी, अशी शिफारस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी आपल्या अहवालात केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती राहुल गांधी यांनी केली आहे. त्यामुळे पटोले प्रदेशाध्यक्षपदी राहावे की नाही या मुद्याला चेन्निथला यांनी आपल्या अहवालात बगल दिली आहे पण पटोले यांच्या निर्णयांशी पक्षातले ज्येष्ठ नेते सहमत होत नसल्यामुळे प्रदेश काँग्रेसशी संबंधित सर्व महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांची एक समिती स्थापन करून सामूहिक निर्णय प्रणाली अंमलात आणावी, अशी शिफारस त्यांनी केली आहे. काँग्रेसश्रेष्ठींनी चेन्निथला यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक म्हणून नियुक्त करुन अहवाल सादर करण्यास सांगितले होते.
चेन्निथला यांच्या शिफारसीनुसार प्रस्तावित समितीत प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या व्यतिरिक्त सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील या नेत्यांचा समावेश होऊ शकेल.
काय आहे चेन्निथला यांच्या अहवालात?
- लोकसभा निवडणुकीची उलटगणती सुरू झाली असतानाच प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून नाना पटोले यांना हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पटोले यांना हटविण्याच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली दरबारात त्यांचे विरोधक सतत धडकत असताना पटोलेसमर्थकही दिल्लीत सक्रिय झाले आहेत.
- प्रदेशाध्यक्षपदी पटोले असावेत की नाही, या भानगडीत न पडता तो निर्णय काँग्रेसश्रेष्ठींनी घ्यावी, असे नमूद करून राज्यात काँग्रेस पक्षाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ व अनुभवी नेत्यांची समिती स्थापन करावी, असा मधला मार्ग सांगणारी शिफारस चेन्निथला यांनी आपल्या अहवालात केल्याची माहिती काँग्रेस सूत्रांनी दिली.