राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे अजित पवार गटात दाखल झाले आहेत. आज अधिवेशनामध्ये सहभागी झाल्यावर मलिक हे सत्ताधारी बाकावरील मागच्या बेंचवर बसले. दरम्यान, नवाब मलिक अजित पवार गटात आल्यानंतर आता त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपा नेत्यांची काय प्रतिक्रिया असेल, असा प्रश्न विचारला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मलिक यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या मोहित कंबोज यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
नवाब मलिक यांच्याबाबत केलेल्या ट्विटमध्ये मोहित कंबोज म्हणाले की, नवाब मलिक यांच्यासाठी हे नागपूरमधील शेवटचं विधानसभा अधिवेशन आहे. तुम्ही आता तुम्हाला वाटेल तिथे बसा, पण २०२४ मध्ये तुम्ही आमदार बनणार नाहीत, असा इशारा मोहित कंबोज यांनी या ट्विटमधून दिला आहे.
दरम्यान, नवाब मलिक अजित पवार गटात दाखल झाल्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटले. देशद्रोहाचा आरोप करून मांडीला मांडी लावून कसे बसू शकता, असा सवाल ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सत्ताधारी पक्षाला विचारला. त्यावर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवाब मलिक प्रत्यक्ष तुरुंगात असतानाही त्यांना मंत्रिपदावरून काढणार नाही, अशी भूमिका ज्यांच्या नेत्यांनी घेतली. ते आज इथे भूमिका मांडताहेत. आम्ही कुणाच्याही मांडीला मांडी लावून बसलेलो नाही. मी आणि मुख्यमंत्री एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलो आहोत. आमच्या बाजूला अजित पवार आहेत. त्यांच्या बाजूला छगन भुजबळ आहेत. त्यामुळे आमची काळजी करू नका, असं सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.