मुंबई : सध्या सर्वत्र मोठ्या जल्लोषात गणेशोत्सवाचा सण साजरा केला जात आहे. राज्यातील बहुतांश भागांत दीड दिवसांच्या आणि पाच दिवसांच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन झालं आहे. उद्या अर्थात गुरूवारी अनंत चतुर्दशी असून सार्वजनिक गणरायाचे विसर्जन केलं जाणार आहे. अशातच राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली असून ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या मागणीला यश आल्याचे दिसते. खरं तर गुरूवारी अनंत चतुर्दशी आणि ईद-ए- मिलाद हे सण एकाच दिवशी आल्याने महाराष्ट्र सरकारने शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने सोशल मीडियावर एक पोस्ट करत याबद्दल माहिती दिली.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद-ए- मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी २८ सप्टेंबरला होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
तसेच ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती. राज्यात शांततेचे वातावरण असावे आणि गर्दी तसेच मिरवणुकांचे नियोजन करता येणे पोलिसांना शक्य व्हावे म्हणून २९ तारखेस सुट्टी देण्याची विनंती त्यांनी केली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान आदींचा समावेश होता, असेही सीएमओने केलेल्या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे.