खासदार उभे राहूनच जेवले
अंबरनाथमध्ये पत्रकार परिषदेच्या निमित्ताने शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे अंबरनाथ नगरपालिकेत आले होते. पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांच्या जेवणाची सोय पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात करण्यात आली होती. मात्र अधिकारी आणि कार्यकर्त्यांचा गराडा एवढा मोठा होता की, खासदार शिंदे यांना निवांत जेवणेदेखील शक्य झाले नाही. जेवणासाठी क्षणभर विश्रांती घ्यावी, तर कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्यातच त्यांचा सर्वाधिक वेळ गेला. कार्यकर्त्यांची गर्दी कमी होत नसल्याने अखेर खासदारांनी आपले जेवण उभे राहून करत कार्यकर्त्यांचे प्रश्न जाणून घेतले. खासदारांचा हा वाढता व्याप पाहून पालिकेतील अधिकारीदेखील चक्रावून गेले होते.
पोलिसांना तो दिसला नाही
चेंबूर येथे एका कार्यक्रमात सेल्फी घेण्याच्या झटापटीत आ. प्रकाश फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्नील याने गायक सोनू निगम यांना धक्काबुकी करत त्यांच्या मॅनेजमेंट स्टाफला खाली ढकलले. याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. सोनू निगम यांनी आयोजकांकडे चौकशी केल्यानंतर तो आमदाराचा मुलगा असल्याचे स्पष्ट होताच त्यांनी चेंबूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सोनू निगम यांनी आरोपात आमदाराच्या मुलाचा उल्लेख केला असतानाही पोलिसांनी सुरुवातीला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी आमदाराच्या मुलाच्या नावाचा उल्लेख केला. मात्र, पोलिसांना तो आमदारांचा मुलगा असल्यामुळे सुरुवातीला दिसला नाही अशी कुजबुज स्थानिकांमध्ये आहे.
मोर्चात पोलिसच जास्त
ठाण्यात काही दिवसांपासून महापालिका अधिकारी महेश आहेर विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला आहे. आहेर यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महिलांनी नुकतेच पालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन केले होते, परंतु या आंदोलनात सहभागी झालेल्या महिला पदाधिकाऱ्यांपेक्षा या आंदोलनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. त्यामुळे पाहणाऱ्या नागरिकांनाही हसू आवरले नाही. अरे मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांपेक्षा पोलिसांची संख्या येथे जास्त दिसत आहे, त्याची चर्चा आता पालिका वर्तुळात सुरू आहे.
‘सुधर जाओ वरना, एक्सपोज करूंगी’
नवी मुंबई महापालिकेत तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधींची राजवट नसली तरी प्रशासनाकडून शहरात कोट्यवधींची कामे सुरू आहेत. यातील अनेक कामांच्या निविदांत मोठा झोल आहे. यात काही कथित समाजसेवक, पर्यावरणप्रेमी आडकाठी आणत आहेत. यातील काहींची मजल तर थेट आमदार मंदा म्हात्रेंच्या नावाने धमकाविण्यापर्यंत गेली आहे. याचा सुगावा लागताच मंदाताईंनी या लुच्च्यांचा समाचार घेतला आहे. मी लोकप्रतिनिधी या नात्याने वाढीव चटईक्षेत्र आणले आहे. तरीही काहींनी वाशी, नेरूळ, सानपाडा परिसरात धुमाकूळ घातला आहे. या लोकांना एकच सांगते की, ‘सुधर जाओ वरना अधिवेशन मे एक्सपोज करूंगी,’ असा इशाराच मंदाताईंनी दिला आहे.