Asaduddin Owaisi On Maratha Reservation: एक महिना झाला. वेळ संपला. मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्या, असे आवाहन सरकारला करतानाच मी पुन्हा २० जुलैपासून अंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार असून, त्याच दिवशी हे २८८ उमेदवार पाडायचे की आपण उभे करायचे हे ठरवू, अशी पुढील रणनीती मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी घोषित केली. दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी लक्ष्मण हाके यांनी ठाम भूमिका घेतली आहे. यातच एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे, असे म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना ओवेसी म्हणाले की, मुस्लिमांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून शिकावे. मनोज जरांगे पाटील यांनी बोलावल्यास विचार करू. मनोज जरांगे यांचा आदर करतो आणि त्यांचे अभिनंदनही करतो. मनोज जरांगेंमुळे ८ खासदार निवडून आले. परंतु, एकही मुस्लिम उमेदवार निवडून आला आहे. सर्व समाजाचे उमेदवार जिंकतात. पण मुस्लिम उमेदवार जिंकत नाही, असे ओवेसी यांनी सांगितले.
मनोज जरांगेंकडून प्रस्ताव आल्यास चर्चा करू
आमचा एकमेव उमेदवार जिंकून आला नसल्याचे दुःख आहे. मुस्लिम जनतेने सर्वांना मतदान केले, मग आम्हाला का मतदान करत नाही. यावर मुस्लिम समाजाने विचार केला पाहिजे. मनोज जरांगे प्रस्ताव आला तर पत्रकारांना सोबत घेऊन जाऊन चर्चा करू. बीडमध्ये मनोज जरांगे यांच्यामुळे पंकजा मुंडे पडल्या. त्यांना विजय मिळत आहे. मग मुस्लिम का जिंकत नाही. महाराष्ट्र असलेल्या ११ टक्के मुस्लिमसाठी दुःख आहे. त्यांच्याकडून बोलणे होत असेल तर नक्की बोलू, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुस्लिम आरक्षणाबाबत न्यायालयाचे आदेश आहेत. मोदी म्हणतात मी बॅकवर्डचा नेता आहे. मग आरक्षणाच्या टक्क्याबाबतचे विधेयक संसदेत आणा. महाराष्ट्राने मुस्लिम उमेदवार दिला नाही. आमचा एक उमेदवार होता, त्याला सर्वांनी मिळून हरवले. आम्हीच फक्त भाजपचा विरोध करत आहोत. आम्ही जिंकण्यासाठी लढतो, कुणाला पाडण्यासाठी लढत नाही, असे ओवेसी म्हणाले.