गाणे गाताना ते सुरेल असण्याबरोबरच त्यातील शब्द आणि भावना या रसिकांपर्यंत पोहेचणे अतिशय महत्त्वाचे असते, हे जाणून ज्येष्ठ संगीतकार, गीतकार व गायक यशवंत देव यांनी असंख्य अजरामर गाणी लिहिली, गायली आणि चालीही दिल्या. त्यांना रसिकांची नाळ अचूक सापडली होती. त्यामुळेच अनेक दशके त्यांनी मराठी संगीत विश्वावर अधिराज्य गाजवले. ‘स्वर आले दुरुनी, भातुकलीच्या खेळामधली, दिवस तुझे हे फुलायचे, अशी पाखरे येती, या जन्मावर या जगण्यावर, जीवनात ही घडी अशीच राहू दे, कुठे शोधिसी रामेश्वर’ अशा सुरेख गीतांची बांधणी त्यांनी केली. मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रतिभावान कलाकाराला ‘लोकमत’तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली...संगीतकार, गीतकार व गायक यशवंत देव मंगळवारी पहाटे काळाच्या पडद्याआड गेले. १ नोव्हेंबर १९२६ रोजी यशवंत देव यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हेच त्यांचे पहिले गुरू होते. त्यांचे वडील विविध वाद्ये वाजवत असत. त्यांचे तबल्यावर विलक्षण प्रेम होते. यशवंत देव यांना त्यांच्याकडूनच तालाचे बाळकडू मिळाले.पुढे जी.एन. जोशी, गजाननराव वाटवे आदींच्या ते संपर्कात आले. यशवंत देव यांचा प्रवास गाण्यातून कवितेकडे झाला. अनेक भावगीतांना त्यांनी स्वरसाज चढवला. बालकविता, विडंबन; तसेच विनोदी काव्यप्रकारही त्यांनी लिहिले. हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ संगीतकार अनिल विश्वास यांना त्यांनी गुरू मानले होते.यशवंत देव यांनी आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून कारकीर्द सुरू केली. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला ‘भावसरगम’ हा कार्यक्रम खूप गाजला. पुढे एच.एम.व्ही.च्या नोकरीने त्यांना अनुभवसमृद्ध केले. लता मंगेशकर, वसंत प्रभू, पी. सावळाराम तसेच आशा भोसले यांची गाणी या काळात गाजत होती. या सगळ्याचे यशवंत देव साक्षीदार ठरले. एच.एम.व्ही.च्या नोकरीनंतर त्यांनी गाण्याचे क्लास सुरू केले. त्यांच्या शिष्यवर्गातील एक प्रख्यात नाव म्हणजे पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर. यशवंत देव यांच्या संगीत दिग्दर्शनाखालील ‘मधुवंतीच्या सुरासुरातून’, ‘श्रीरामाचे चरण धरावे’, ‘पक्षिणी प्रभाती चारियासी जाये’ ही गाणी त्यांनी गायली आणि ती लोकप्रिय झाली.यशवंत देव यांनी ‘रियाजाचा कानमंत्र’, ‘कृतज्ञतेच्या सरी’, ‘शब्दप्रधान गायकी’, ‘कधी बहर कधी शिशिर’ अशा अनेक पुस्तकांचे लेखन केले. रजनीश यांच्या लेखनाचा भावानुवादही केला. उत्तम संगीतकार, गीतकार व गायक असे तिहेरी रंग त्यांच्यात सामावलेले होते. ‘बावनखणी’, ‘चारचौघी’, ‘सख्खे शेजारी’, ‘घनश्याम नयनी आला’ या व अशा ३० हून अधिक नाटकांना त्यांनी संगीत दिले.सचिन शंकर बॅले ग्रुपने सादर केलेल्या ‘कथा ही रामजानकीची’ या नृत्यनाटिकेलाही त्यांनी संगीत दिले होते. आकाशवाणीवरील ‘भावसरगम’, ‘असे गीत जन्मा येते’, ‘शब्दप्रधान गायकी’, ‘रियाजाचा कानमंत्र’ आणि स्वत:च्या रचनांचे रंगमंचीय कार्यक्रम त्यांनी सादर केले. अनेक विडंबनगीतेही त्यांनी केली. याचबरोबर संगीतविषयक कार्यशाळा घेतल्या.संगीत क्षेत्रातले एक हरहुन्नरी असे व्यक्तिमत्त्व निघून गेले आहे. कवी, लेखक, संगीतकार अशा अनेक भूमिका निभावणारा माणूस आपल्याला सोडून गेला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात विविध रंग होते. माझी पहिली सीडी ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’ यातली सगळी गाणी यशवंत देव यांनी संगीतबद्ध केली होती. त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मला गायला मिळाले हे मी माझे भाग्य समजते.- पद्मजा फेणाणी, ज्येष्ठ गायिकाआम्ही भेटलो की देवबाप्पा म्हणत नमस्कार करायचे, असे ठरलेलेच होते. नमस्कार करण्यासारखा तसाही हा एकच देव होता. त्यांच्यासोबत मी बावनखणी, विठो रखुमाई अशी काही नाटके केली. बसल्याबसल्या चटकन ते गीतांना चाली लावायचे. शब्दांचा अर्थ ते उलगडून दाखवत. त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळाले. संगीतातले तर ते गुरू होतेच; परंतु जीवनातही ते गुरुस्थानी राहिले.- अरविंद पिळगावकर,ज्येष्ठ गायकयशवंत देव यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका मोठ्या कालखंडाची आज सांगता झाली. त्यांनी आपल्या अवीट गोडीच्या चाली इतक्या मोठ्या प्रमाणात रसिकांना दिल्या आहेत की त्याचे मोजमाप करणे कठीण आहे. चाल प्रासादिक असावी, तिच्यात गोडवा असावा; याची पूर्ण जाणीव ठेवून त्यांनी चाली दिल्या. ‘कधी बहर कधी शिशिर’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ अशी त्यांची काही भावगीते बाबूजींनी (सुधीर फडके) गायली. सत्तरच्या दशकातली ही गाणी अजूनही लोकांना आवडतात यातच सर्व काही आले. या चालींचा गोडवा यापुढेही असाच कायम टिकणार आहे. माझ्याकडूनही त्यांनी ९ गाणी गाऊन घेतली होती. माझे गाणे चांगले व्हावे म्हणून त्यांनी माझ्यावर भरपूर मेहनत घेतली. बाबूजींचा आदर्श डोळ्यांसमोर ठेव, असेच त्यांनी मला सांगितले होते. स्वत: इतके मोठे संगीतकार असूनही त्यांनी मला हा उपदेश केला, हे माझ्या मनावर कायमस्वरूपी कोरले गेले आहे.- श्रीधर फडके, ज्येष्ठ संगीतकारयशवंत देव हे संगीत क्षेत्रात अत्युच्च स्थानी होते. अतिशय साध्या, सरळ व सोप्या चाली आणि शब्दांना अंत:करणापर्यंत पोहोचवण्याची कला त्यांच्याकडे होती. त्यांची गाणी ऐकायला खूप सोपी वाटायची; पण त्यातल्या शब्दांचा अर्थ लागला की त्या शब्दांना हीच चाल योग्य आहे हे समजून यायचे. शब्दांचा अर्थ उलगडून सांगणाऱ्या त्यांच्या चाली होत्या. अतिशय मृदू स्वभाव आणि कुठेही गर्व नाही; अशी त्यांची वृत्ती होती. वंदनीय प्रतिमा असलेले आणि वंदनीय प्रतिभा असलेले असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.- राणी वर्मा, ज्येष्ठ गायिकाज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांच्या निधनाने शब्दांसोबतच सुरांवर प्रभूत्व असलेला आणि मराठी भावगीतांचे विश्व समृध्द करणारा एक अस्सल कलावंत हरपला आहे. नव्या पिढीच्या आवडींशी नाळ जोडतानाच संगीताचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांची अविरत धडपड होती. त्यांच्या निधनाने नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीशब्दप्रधान गायकीचे महत्त्व जपणारे आणि मराठी भावसंगीतावर ‘शतदा प्रेम’ करायला लावणाºया ज्येष्ठ संगीतकार, गायक, कवी, गीतकार पं. यशवंत देव यांच्या निधनामुळे संगीत विश्वातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व गमावले आहे. यशवंत देव यांनी अभंग, भावगीत, लोकगीत, युगलगीतांना संगीतबद्ध केले. गेली अनेक दशके त्यांनी संगीत विश्वाला समृद्ध केले. ‘या जन्मावर’, ‘या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’, ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘कुठे शोधिसी रामेश्वर’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार रचनांना यशवंत देव यांनी संगीतबद्ध केल्याने, ही गीते अजरामर ठरली आहेत. त्यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर, संगीतकार वसंत प्रभू, कवी, गीतकार पी. सावळाराम, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर यांनी गायलेल्या गीतांना सुरेल संगीताची साथ दिली. संगीत विश्वात आपल्या कर्तृत्वातून महत्त्वाचे स्थान निर्माण करणाºया यशवंत देव यांच्या निधनाने संगीत विश्वाची मोठी हानी झाली आहे.- विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्रीमराठी भावगीत परंपरेतील श्रेष्ठतम अशा गायन-लेखन युगाचा शेवटचा नायक यशवंत देव यांच्या निधनाने आपण गमावला. उत्तम कलावंतासोबत माणूस म्हणूनही आपण उत्तम कसे राहू शकतो, याचा ते उत्तम आदर्श होते. नागपूरला ते असल्यापासूनचा माझा व त्यांचा जुना ऋणानुबंध आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने त्यांना विनम्र श्रद्धांजली.- श्रीपाद भालचंद्र जोशी,अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळसंगीतबद्ध केलेली गाणीअखेरचे येतील माझ्या, अपुल्या हाती नसते काही, अंबरात नाजुकशी, अरे देवा तुझी मुले अशी, अर्धीच रात्र वेडी, अशी धरा असे गगन, अशी पाखरे येती आणिक, असेन मी नसेन मी, आज राणी पूर्वीची ती, आठव येतो मज, आम्हींं जावें कवण्या, आळवितां धाव घाली, उघडी नयन शंकरा, एवढेतरी करून जा, करिते जीवनाची भैरवी, कामापुरता मामा, काही बोलायाचे आहे, कुठला मधु झंकार, कुठे शोधिसी रामेश्वर, कुणी काही म्हणा, कुणी जाल का, केळीचे सुकले बाग, कोण येणार ग पाहुणे, कृष्णा उडवू नको रंग, गणपती तू गुणपती तू. मिळालेले पुरस्कारराज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा सन्मान पुरस्कार, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार.
असेन मी, नसेन मी...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 5:51 AM