ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ३ - ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी 'पद्म भूषण' पुरस्कार मिळवण्यासाठी आपल्याकडे मदत मागितली होती असा दावा केंद्रीय वाहतूक आणि रस्ते, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
महाराष्ट्रात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना गडकरींना हा गौफ्यस्फोट केला. हे असे पुरस्कार सरकारसाठी डोकेदुखी असतात असेही गडकरी म्हणाले. पद्मभूषण पुरस्कारासाठी मी आशा पारेख यांच्या नावाची शिफारस करावी म्हणून त्या मला भेटायला आल्या होत्या.
त्यावेळी मी ज्या अपार्टमेंटमध्ये रहात होतो तिथे लिफ्ट बंद होती. त्यामुळे त्या बारामाळे पायी चढून मला भेटण्यासाठी आल्या. त्यावेळी मला वाईट वाटले होते असे गडकरी म्हणाले. पुरस्कार वापसी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.
आपल्याला पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे पण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेले योगदान लक्षात घेता पद्मभूषण पुरस्कारासाठी आपण योग्य आहोत असे त्यांनी मला सांगितले असे गडकरी म्हणाले. १९५९ ते १९७३ या काळात आशा पारेख यांनी हिंदी चित्रपटसृष्टीचा रुपेरी पडदा आपल्या अभिनयाने गाजवला होता. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन १९९२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते.
गडकरींच्या या खुलाशावर बॉलिवूडमधून सोशल मिडीयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी आशा पारेख यांची प्रतिमा खराब करत असल्याबद्दल गडकरींवर टीका केली आहे, तर काहींना गडकरींच्या या खुलाशामुळे आपल्याला धक्का बसल्याचे म्हटले आहे.