आध्यत्मिक वारीतून हरित आणि पर्यावरणाचा संदेश विश्वास मोरे लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : 'ज्ञानोबा-तुकाराम' असा हरीनामाचा जयघोष करित पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळा शनिवारी सव्वा पाच वाजता उद्योगनगरीत प्रवेशाला. दरवर्षीपेक्षा अर्धा तास उशिराने सोहळा शहरात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोहळ्यात उपस्थित राहणार असल्याने भक्ती- शक्ती चौकामध्ये सोहळा थांबविल्याची चर्चा रंगली होती. माहिती पुस्तिका, झाडांच्या बिया, पुष्पहार आणि श्रीफळ देऊन दिंड्याचा सत्कार केला. वृक्षारोपण, वृक्षदिंडी, हरीतवारी असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
देहूकरांचे आदरातिथ्य स्वीकारून तुकोबारायांचा सोहळा वारीची वाट चालू लागला. मजल दर मजल करीत सोहळा पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रवेशद्वारावर अर्थात भक्तीशक्ती चौकात सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास चौघडा पोहोचला. तर साडेसहापर्यंत सोहळा चौकातच थांबला होता. शहराच्या वतीने अतिरिक्त अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी स्वागत केले. यावेळी नागरीकांनी पुष्पवृष्ठी केली. यावेळी स्वागतमंचावर आयुक्त चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, यशवंत डांगे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, डॉ. लक्ष्मण गोफने उपस्थित होते. यावेळी दिंडी प्रमुखांचा सत्कार केला.फुगडीचा आनंद!स्वागताच्या ठिकाणी पारंपरिक वेशभुषेत असलेल्या वारकरी आणि नागरिकांनी अभंगावर ठेका धरला. फुगडीचा आनंदही घेतला. यावेळी हरितवारी दिंडी काढली होती. पर्यावरणाचा संदेश, झाडे लावा झाडे जगवा, हरितवारी प्लास्टिकमुक्त वारी असा संदेश देण्यात आला. सव्वा सहाच्या सुमारास पालखी रथ महापालिका कक्षाजवळ आला असताना मोठ्या प्रमाणावर पुष्पवृष्टी करण्यात आली. एकीकडे पालखीचे दर्शन घेण्यासाठी तर दुसरीकडे सोहळ्याचा क्षण मोबाईलमध्ये टिपण्यासाठी झुंबड उडाली होती. पावसाची हजेरी, मुख्यमंत्रीची चर्चा! सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे वारकरी आनंदले. पालखी सोहळा मार्गावर नदीप्रमाणे प्रवाही असतो. मात्र, सुमारे अर्धा तास सोहळा याच ठिकाणी थांबला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोहळ्यात सहभागी होणार आहेत, म्हणून सोहळा थांबला आहे, अशी चर्चाही रंगली होती. त्यामुळे देहूरोड सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वारकरी रस्त्यावर उभे होते. त्यानंतर पावणे सहाच्या सुमारास पुन्हा दिंड्या पुढे सरकू लागल्या. सोहळा का थांबला होता? याबाबतचे उत्तर मिळू शकले नाही. वारकºयांनाही आवरला नाही सेल्फीचा मोह! पालखी सोहळ्यात स्वागताच्या ठिकाणी पर्यावरणाचा संदेश दिला जात होता. तर वारीत सहभागी होऊन नागरिक सेल्फी काढत होते. त्यामुळे येथील नूर काही औरच होता. महापालिकेच्या वतीने स्थापत्य, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्थेबरोबरच यंदाची वारी पर्यावरणपूरक, प्लास्टिक मुक्त, हरितवारी करण्याच्या दृष्टीने नियोजन केल्याचे दिसले. राजकीय पक्षांतर्फे स्वागत!पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन, पालखी मुक्काम, वारकरी निवास आणि पालखी मार्गावर सज्जता होती. आकुर्डी येथील विठ्ठल रुख्मिणी मंदीरामध्ये रात्री पावणे आठला पालखी मुक्कामासाठी विसावला. दिंड्यांच्या मुक्काम ज्या महापालिकेच्या शाळांमध्ये असतो तसेच इतर खाजगी ठिकाणी असतो, तेथे महापालिकेच्या वतीने आवश्यक सुविधा पुरविल्या आहेत. तसेच विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे पालखी मार्गावर निगडीपासून तर महापालिकेपर्यंत ठिकठिकणी राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या वतीने स्वागत फलक लावले होते. स्वागतकक्षही उभारले होते.