ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 11- पूर्व नागपुरातील हसनबाग येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचार सभेत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह मंचावर उपस्थित नेत्यांवर एका असंतुष्ट कार्यकर्त्याने शाई फेकली. काही असंतुष्टांनी लांबून अंडेही फेकले. यामुळे संतप्त झालेल्या समर्थकांनी शाही फेकणा-याला बोदम चोप दिला. या प्रकारामुळे सभेत एकच गोंधळ उडाला.
ललित बघे असे शाईहल्ला करणा-याचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. या सभेत माजी मंत्री नसीम खान यांचे भाषण सुरू असताना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण मंचावर आले. मंचावर माजी मंत्री विलास मुत्तेमवार, आ. भाई जगताप, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, प्रवक्ते अतुल लोंढे, शेख हुसैन, अशोक धवड आदी नेते उपस्थित होते.
रात्री आठ वाजण्याच्या सुमारास माथाडी कामगारांचे नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे खंदे समर्थक असलेले ललित बघेल हे एकाएक मंचावर आले. त्यांनी खिशातून एक बॉटल काढत अशोक चव्हाण यांच्यावर शाई फेकली. याच वेळी लांबून काही कार्यकर्त्यांनी मंचाच्या दिशेने अंडे फेकले. एवढ्याच मंचावर उपस्थित पदाधिका-यांनी शाई फेकणा-याला पडकले व चोप देण्यास सुरुवात केली.
यानंतर समर्थकांनीही बेदम चोप दिला. या प्रकारामुळे सभेत एकच गोंधळ उडाला. चव्हाण सभा सोडून निघून गेले. काही वेळांनी तणाव निवळल्यावर चव्हाण पुन्हा मंचावर आले व भाषणही दिले.
सभेमध्ये विघ्न आणण्याचे प्रयत्न - अशोक चव्हाण
छुप्या पद्धतीने भाजप-सेनेचा प्रचार करणा-यांचा हा डाव आहे. शाई फेकणा-याला कार्यकर्त्यांनी पकडले आहे. त्याने का व कुणाच्या सांगण्यावरून हा प्रकार केला याची माहिती घेतली जात आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. काँग्रेसची सभा उधळण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला. भाजपाला मदत करण्याची भूमिका या घटनेमागे दिसून येते. मात्र, घटनेनंतरही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे सभा घेण्यात आली. माजी मुख्यमंत्र्यांची सभा असतानाही सभेला नावापुरतीच सुरक्षा व्यवस्था होती याकडे लक्ष वेधत चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली.