मुख्यमंत्र्यांविरुद्ध काँग्रेसचा 'पटोले पॅटर्न'; 'या' नेत्याला दिली उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 03:20 PM2019-10-05T15:20:12+5:302019-10-05T15:50:48+5:30

लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी गडकरींविरुद्ध लढा दिला होता. गडकरी आणि पटोले यांचे संबंध चांगले होते. त्याचप्रमाणे आशिष देशमुख आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संबंधही मैत्रीपूर्ण आहे. परंतु, निवडणुकीच्या निमित्ताने दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकले आहे.

ashish deshmukh against chief minister devendra fadnavis | मुख्यमंत्र्यांविरुद्ध काँग्रेसचा 'पटोले पॅटर्न'; 'या' नेत्याला दिली उमेदवारी

मुख्यमंत्र्यांविरुद्ध काँग्रेसचा 'पटोले पॅटर्न'; 'या' नेत्याला दिली उमेदवारी

Next

- रवींद्र देशमुख

मुंबई - भाजपच्या प्रमुख नेत्याविरुद्ध तगडा उमेदवार देण्याचा पायंडा काँग्रेसमध्ये पडल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत एक अनोखा प्रयोग करत काँग्रेसकडून महाराष्ट्रातील भाजपचे वजनदार नेते नितीन गडकरी यांच्याविरुद्ध भाजपचेच बंडखोर खासदार नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली होती. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध भाजपचे बंडखोर आमदार आशिष देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नागपूर नैऋत्य मतदार संघात मुख्यमंत्र्यांविरुद्ध पटोले पॅटर्न राबविला जातोय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

2014 मध्ये आशिष देशमुख भाजपकडून निवडून आले होते. परंतु, वेगळा विदर्भ आणि शेतकरी समस्या यावरून देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांवरच टीका केली होती. त्यानंतर त्यांनी भाजप सोडून काँग्रेसचा हात धरला होता. देशमुख यांचे घराणे मुळाचे काँग्रेसी. वडिल रणजीत देशमुख काँग्रेसमध्ये मंत्री होती. तर 2014 मध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांना टक्कर दिली होती. तर आशिष देशमुख 2014 मध्ये भाजपकडून लढले होते. मात्र ते भाजपमध्ये जास्त काळ रमले नाही.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दिल्लीतीन नेत्यांनीच आशिष देशमुख यांना मुख्यमंत्र्यांविरोधात उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भात तरी मुख्यमंत्र्यांना टक्कर देऊ शकेल, असा नेता काँग्रेसमध्ये नसल्याची भावना पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे नागपूर नैऋत्यमधील लढत राज्यासाठी चर्चेचा विषय होणार आहे.

दरम्यान भाजपच्या तगड्या उमेदवाराला त्यांच्याच बंडखोरांकडून प्रत्युत्तर देण्याचा पॅटर्न काँग्रेसने गडकरी यांच्याविरुद्ध राबवला होता. आता तोच पॅटर्न मुख्यमंत्र्यांविरुद्ध वापरला जातोय. लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी गडकरींविरुद्ध लढा दिला होता. परंतु, त्यांना पराभव पत्करावा लागला . आता भाजपचे बंडखोर आमदार आशिष देशमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देत आहे. मात्र काँग्रसच्या या पटोले पॅटर्नला कितपत यश येईल, हे येणारा काळच सांगणार आहे.

 

Web Title: ashish deshmukh against chief minister devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.