Ashish Deskhmukh News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपासंदर्भात अद्याप महाविकास आघाडीमध्ये एकमत झालेले नाही. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यातच या बैठकीला आता महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला अधिकृत निमंत्रण दिले आहे. या घडामोडी सुरू असताना भाजप नेते आशिष देशमुख यांनी मोठा दावा केला आहे.
विकसित भारताची संकल्पना साकार करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक नेते भाजपामध्ये येण्यास इच्छूक आहेत. अलीकडेच उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि माजी खासदार उल्हास पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यापूर्वी माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशाला जगतगुरू करण्यासाठी अनेक नेते भाजपामध्ये येणार आहेत. आम्ही त्या सर्वांचे स्वागत करतो, असे आशिष देशमुख यांनी म्हटले आहे.
थोड्याच दिवसात भाजपा प्रवेशाचा मुहूर्त तुम्हाला कळेल
महाविकास आघाडीच्या बैठकीत वाटाघाटी तीनही पक्षाचे नेते सहभागी होत आहेत. त्यात महत्त्वाच्या नेत्यांपैकी दोन नेत्यांची भाजपशी पूर्णपणे बोलणी झालेली आहे. लवकरच ते भाजपामध्ये प्रवेश करतील. काही दिवस वाट पाहा. थोड्याच दिवसात भाजपा प्रवेशाचा मुहूर्त तुम्हाला कळेल, असे आशिष देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान, महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत. आता वंचित बहुजन आघाडी या बैठकील उपस्थित राहणार का नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.