विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मुंबईतील इमारतींमध्ये मराठी माणसांसाठी ५० टक्के घरे आरक्षित ठेवण्याची मागणी केली आहे. त्यावरून आता मुंबईतील राजकीय वर्तुळात एका नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. दरम्यान, अनिल परब यांनी केलेल्या मागणीवरून भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे. लोकसभा निवडणुकीत मते दिली नाहीत, म्हणून आता मराठी माणूस तुम्हाला आठवला का? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे.
अनिल परब यांनी केलेल्या मागणीवर प्रतिक्रिया देताना केलेल्या ट्विटमध्ये आशिष शेलार यांनी विचारले की, आघाडीचे सरकार असताना तब्बल ५० टक्के प्रीमियम बिल्डरांना माफ केलात, तेव्हा मराठी माणसाला ५० टक्के घरे राखीव ठेवा, असे का सांगितले नाही? पत्रा चाळीतील मराठी माणसाच्या घरांमध्ये कट कमिशन खाल्ले, तेव्हा मराठी माणसांची तुम्हाला आठवण झाली नाही का? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला.
या ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणाले की, २५ वर्षे मुंबई महापालिकेत सत्तेत होतात, तेव्हा मराठी माणसांच्या घरांसाठी काय केलेत? लोकसभा निवडणुकीत मते दिली नाहीत, म्हणून आता मराठी माणूस तुम्हाला आठवला का? मराठी माणसाला ५० टक्क्यांचे आरक्षण मागायचे आणि उरलेल्या मध्ये "हिरव्यांना" घुसवायचे? असे तर नाही ना? अशी शंकाही आशिष शेलार यांनी उपस्थित केली.
भाजपाने गिरणी कामगारांना घरे दिली, बीडीडी चाळीतील मराठी माणसाची हक्काची घरे उभी राहिली! नुसते भावनेचे घोडे कागदावर नाचवायचे आणि मराठी माणसाला वर्षानुवर्षे फसवायचे, अशा शब्दात आशिष शेलार यांनी अनिल परब यांनी केलेल्या मागणीची खिल्ली उडवली.