मुंबई : विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून देण्यात आलेल्या घोषणा पाहून आम्हालाही मागचे दिवस आठवले, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला लगावला होता. त्यावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर देत, सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज आला असल्याचं म्हणत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना शेलार म्हणाले की, सत्तेत बसल्यावर विरोधकांनी आवाज उठवलेल्या मुद्यांकडे लक्ष देण्याएवजी त्यावर विकृतपणे भाष्य करणे यातूनच सत्तेचा माज दिसून येतो. मात्र सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी आमचा घसा कोरडा काय, फुटला तरीही आम्ही शेतकरी आणि महिलांसाठी बोलू, असा इशारा त्यांनी यावेळी सरकाराला दिला.
तर लाखो शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणत असताना प्रत्यक्षात हजारोंची यादी समोर आली आहे. सरसकट कर्जमाफी, सात बारा कोरा या सर्व त्यांच्या घोषणा आहे. तर आम्ही वचनाला न फिरणारे असल्याचं म्हणणारे मुख्यमंत्री बांधावर जाऊन दिलेलं वचन का विसरले?, त्याची आठवण त्यांना करून देणार असल्याचे सुद्धा शेलार म्हणाले.