Uddhav Thackeray BJP News: वणी येथे प्रचारसभेसाठी गेल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची बॅग तपासली. निवडणूक अधिकाऱ्यांकडून बॅग तपासली जात असताना ठाकरेंनी त्याचं चित्रीकरण केलं आणि पंतप्रधान मोदीपासून ते मुख्यमंत्री शिंदेंपर्यंत महायुतीच्या नेत्यांवर टीका केली. ठाकरेंकडून करण्यात आलेल्या टीकेला आता भाजपकडूनही उत्तर देण्यात आले आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी 'घाबरायचे कारण काय?', असा सवाल करत ठाकरेंना लक्ष्य केले.
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याही बॅग तपासा अशी टीका केली होती. ठाकरेंची बॅग तपासल्याचा मुद्दा विरोधकांनी लावून धरल्याचे दिसत असून, शेलारांनी ठाकरेंना उलट सवाल केला आहे.
"घाबरायचे कारण काय?", शेलारांनी ठाकरेंना घेरलं
"जेवणाच्या ताटावरच ज्यांनी केली होती केंद्रीय मंत्र्यांना अटक,कोरोनात पत्रकारांना आणले फरफटत..कुणाच्या घरावर चालवले बुलडोझर,कुणाचे फोडले डोळे..मुख्यमंत्री असताना केवढे केले होते यांनी अनधिकृत चाळे", असा हल्ला शेलारांनी ठाकरेंवर चढवला.
"काल त्यांचे नुसते विमान तपासले म्हणून केवढे झाले ओले,युतीच्या मुख्यमंत्र्यांचे ज्यांनी तपासले होते विमानतीच यंत्रणा वागली तुमच्याशी ही कायद्याने समान", असे शेलार यांनी म्हटले आहे.
"मर्दांच्या पक्ष प्रमुखाने, एवढे घाबरायचे कारण काय?लोकशाही आणि नियतीच्या दरबारात असतो समान न्याय", असे उत्तर शेलारांनी ठाकरेंना दिले.
उद्धव ठाकरे कशाला घाबरत आहेत? -सोमय्या
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनीही ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले आहे. "निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅग्ज तपासल्या म्हणून उद्धव ठाकरेंना खूप राग आला. ५ नोव्हेंबर रोजी कोल्हापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर आणि बॅग्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासण्यात आल्या. मग उद्धव ठाकरे कशाला घाबरत आहेत?", असा सवाल किरीट सोमय्यांनी केला.