मुंबई : भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी एका कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा-मेनन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.शेलार यांनी रिद्धी आणि सर्वेश्वर या दोन कंपन्यांच्या माध्यमातून कोलकाता पॅटर्नचा वापर करून कोट्यवधींची अफरातफर केली आहे. गेल्या पाच वर्षांत या कंपनीची उलाढाल १५ हजार रुपयांहून कमी होती, तरीही या कंपन्यांचे शेअर मात्र चढ्या किमतीने विकले गेले. या प्रकरणात शेलार यांचे पीए प्रकाश पाटील आणि सुनील परब हे दोघेही सामील असल्याचा आरोप प्रीती शर्मा-मेनन यांनी केला आहे. शिवाय, शेलार यांनी त्यांच्या एका कंपनीबाबत निवडणूक आयोगापासूनही माहिती लपवलेली आहे, असेही आप नेत्याचे म्हणणे आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून आपने आर्थिक गुन्हे शाखा, एसीबी, ईडी, महाराष्ट्र लोकायुक्त, राज्य निवडणूक आयोग, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या यंत्रणामार्फत चौकशी होईपर्यंत शेलार यांनी त्यांच्या पदांचा राजीनामा देण्याची मागणीही आपने केली आहे. तत्काळ चौकशीला सुरुवात झाली नाही, तर न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही आपने दिला आहे. (प्रतिनिधी)‘अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार’प्रीती शर्मा-मेनन आणि आपने केलेल्या आरोपानंतर आमदार आशिष शेलार यांनी अवघ्या तासाभरातच पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले. शेलार म्हणाले की, याआधीही काही जण एसीबीकडे निनावी तक्रार करून त्रास देण्याचा प्रयत्न करत होते. आपने केलेल्या खुल्या आरोपांमुळे स्पष्टीकरण देण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी करून एकदाचे सत्य समोर आणा, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ज्या कंपन्यांबद्दल आपने आरोप केलेले आहेत, त्या कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा याआधीच दिलेला आहे. जो व्यवसाय करतो, त्याचा कर भरलेला आहे. त्याशिवाय कोणताही अनधिकृत व्यवसाय केलेला नसून, कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे. एवढेच नाही तर आपने केलेल्या बदनामीबद्दल अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असे आशिष शेलार यांनी सांगितले.
आशिष शेलारांनी केली कोट्यवधींची अफरातफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2016 4:45 AM