Ashish Shelar on Shiv Sena: महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेला कमी लेखले जात असल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील बहुतांश आमदारांनी बंड केले. शिंदे गटाने पक्षातील सुमारे ४० आमदार आणि काही अपक्ष आमदार यांच्या साथीने भाजपासोबत सरकार स्थापन केले. खरी शिवसेना कोणाची हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगाच्या दारात सुरू आहे. तशातच दादरमध्ये शिवसेना भवनला शह देण्यासाठी तशाच प्रकारचे एक भव्य दिव्य कार्यालय उभारले जाणार असल्याची चर्चा आहे. या मुद्द्यावरून आज भाजपाचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली.
शिवसेना भवन हे शिवसैनिकांसाठी श्रद्धास्थान आहे. त्याच शिवसेना भवनला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून त्या तोडीचे दुसरे एक शिवसेना कार्यालय दादरमध्ये उभारले जाणार आहे असे बोलले जात आहे. या मुद्द्यावर जेव्हा आशिष शेलार यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी अतिशय सावध पण सूचक प्रतिक्रिया दिली. शिवसेना पक्षाचे कार्यालय दादरमध्ये उभारले जाणार असेल तर त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, "खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. त्यामुळे जर तसे होत असेल तर भाजपाला त्याचा आनंदच आहे."
"निवडणुकीच्या तोंडावर मला मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. माझ्यावर विश्वास दाखवला. आता आमचं ठरलंय की मुंबई महानगर पालिकेत बदल अटळ आहे. पालिकेत आमचाच महापौर बसणार. यापुढे आमची तशी मार्गक्रमणा असेल. मुंबईत भाजपचे काम अजून गतीने वाढवण्यावर भर असणार आहे. गेली दोन दशके हा संघर्ष आम्ही करत आहोत. जहागीर आमची आहे असे मानून मुंबईत भ्रष्टाचाराची बजबजपुरी जी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केली त्यांच्या विरोधात लढू", असे ते म्हणाले.
"मुंबईत रस्त्यावरील खड्डे यातून शिवसेना हात झटकू शकत नाही. कारशेडचा अहंकार त्यातून वाढलेला खर्च ते पाप शिवसेनेचे आहे. संगणक खरेदीपासून जे पाप केले ते शिवसेनेचे आहे. लोकांच्या मनातले चित्र आता भाजपा साकार करेल. भ्रष्ट व्यवस्थेने भरलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तडीपार करू. आमचे टार्गेट आमचा महापौर असेल. राज्याचे नेतृत्व शिंदे आणि देवेंद्र फडणवीस करतील त्यामुळे बाकी निर्णय ते घेतील. पण महापौर भाजपचा आहे", असा आशिष शेलार यांनी व्यक्त केला.