मुंबई: राज्यसभेच्या (Rajya Sabha Election 2022) रिक्त झालेल्या जागांसाठी १० जूनला निवडणूक होणार आहे. मात्र, यावरून आता देशासह राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले असून, दान नेमके कोणाच्या पदरात पडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यातच भाजपने पुन्हा एकदा घोडेबाजाराच्या आरोपांवरून संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊतांना पराभव दिसत असल्याने बालीश विधाने करत असल्याची टीका भाजपने केली आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची विशेष बैठक मुंबईतील कार्यालयात पार पडली. या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह केंद्रीय वाणिज्यमंत्री आणि राज्यसभा निवडणुकीतील भाजप उमेदवार पीयूष गोयल, चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडले.
संजय राऊतांना पराभव दिसतोय
राज्यसभा निवडणुकीची पूर्ण आणि पूर्व तयारी झाली असून सर्व रणनीती, कार्यपद्धतीची ब्लू प्रिंट तयार आहे. भाजपचा तिसरा उमेदवार जिंकणारच आणि शिवसेनेच्या संजयचा पराभव होणारच. रोज सकाळी उठून बोलणाऱ्या संजय राऊत यांचे बोलणे हे बालीश आणि पोरकटपणाचे आहे. त्यांना कदाचित स्वपक्षाचा पराभव दिसत असेल. त्यामुळे ते असे बोलत आहेत. केंद्रीय यंत्रणांचा वापर होत असल्याचा त्यांचा आरोप बिनबुडाचा आहे. पराभव दिसत असल्यानेच राऊत यांनी आतापासून कारणांची पेरणी करण्याचे काम सुरू केले आहे. राऊत तबेल्यात राहत असल्यामुळे त्यांना घोडेबाजार दिसत असावा, असा खोचक टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.
स्वपक्षीय आमदारांना नजरकैदेत ठेवले जाते
पक्षाच्या आमदारांना नजरकैदेत ठेवण्याची वेळ महाविकास आघाडीवर का आली? आमदारांवर विश्वास नसल्याचं चित्र समोर येते. स्वपक्षीय आमदारांना नजरकैदेत ठेवले जाते. कुठल्या केंद्रीय यंत्रणेचा उपयोग या निवडणुकीत होतोय याचा पुरावा त्यांच्याकडे नाही, असे आशिष शेलार म्हणाले. तसेच कोल्हापूरातील आमदार सतेज पाटलांनी सांभाळले तरी पुरेसे आहेत. दुसऱ्यावर दोष देण्याआधी स्वत:च्या आमदारांना नजरकैदेत ठेवावे लागते. आमदारांना नजरकैदेत ठेवण्याचे पाप करणारे लोकशाहीवर बोलतात. आजपर्यंत कुठल्याही पक्षाने आमदारांचा इतका अपमान केला नाही. शिवसेनेचे आमदार उघड बोलत आहेत, असेही आशिष शेलार म्हणाले.
दरम्यान, राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जूनला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत भाजपाकडे २, शिवसेना १, काँग्रेस १, राष्ट्रवादी १ असे उमेदवार निवडून येण्याइतपत संख्याबळ आहे. मात्र सहाव्या जागेसाठी शिवसेना-भाजपा यांच्यात थेट लढत आहे. यात भाजपाकडे जादाची ३० मते असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तर शिवसेनेनेही आपला उमेदवार निवडून येईल इतके संख्याबळ आहे असं सांगितले आहे. या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी चुरशीची लढाई आहे.