उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. "आगामी लोकसभेत भाजपाचे 400 जागांचा आकडा पार करण्याचे स्वप्न आहे. पण, आता हीच वेळ आहे, एका व्यक्तीचे आणि पक्षाचे सरकार हद्दपार करावे लागेल. हे सरकार आपल्या देशासाठी धोकादायक आहे. आम्ही सर्वजण इथे निवडणूक प्रचारासाठी नाही, तर लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आलो आहोत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, अशा लोकांनाच भाजपने पक्षात सामावून घेतले आहे."
"भाजपाने भ्रष्टाचाऱ्यांना त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून स्वच्छ केले. हा भ्रष्टाचाराने भरलेला पक्ष सरकार कसे चालवू शकतो? असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. या टीकेला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "उद्धवजींसारखा 'दोगला' मुख्यमंत्री मी आजपर्यंत पाहिलेला नाही!" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"उद्धवजींसारखा 'दोगला' मुख्यमंत्री मी आजपर्यंत पाहिलेला नाही! कॅमेर्याच्या लेन्स तुम्ही बदलता पण कॅमेर्याबरोबर भ्रष्ट आणि अभ्रष्ट ठरवणार्या दूषित लेन्सचा तुम्ही कधी पासून वापर करायला लागलात?" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
"उद्धवजी…..! गद्दारीचा घिसापीटा राग आळवताना आपण आमच्या पाठीत खंजीर खुपसलात, हे तुम्ही विसरू नका. अशा खंजीरखुपशांसोबतची तुमची आघाडी म्हणजे भ्रष्टाचारातल्या समस्त ढवळ्या-पवळ्या जमातीचं मनोमीलन आहे. त्यामुळे भाजपविरोधात आरोपांचा खोटा हंबरडा फोडून काही साध्य होणार नाही…."
"जनतेचा मोदीजींवर विश्वास आहे; कारण मोदीजी आपल्या दिलेल्या प्रत्येक गॅरंटीला जागलेत. आताही ४०० पारचं उद्दिष्ट साध्य करून भाजपसह महायुतीचा विजयरथ दिमाखात उधळणार…मागच्या दोन्ही वेळांप्रमाणे जनता तुमची वेसण करकचून आवळणार…" असंही चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.