मुंबई - शुक्रवारी १४ फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये महाराष्ट्राची मेगामुलाखत रंगणार असून, यामध्ये सुप्रसिध्द 'लय भारी' सिनेअभिनेते रितेश देशमुख हे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व माजी आमदार अमिता चव्हाण यांना बोलते करणार आहेत.
स्व.डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दीच्या निमित्ताने 'स्व. शंकरराव चव्हाण- त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या नजरेतून...' या संकल्पनेतून शुक्रवारी १४ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वा. यशवंत महाविद्यालयाचे प्रांगण, नांदेड येथे हा कार्यक्रम होईल. ‘आनंदाचे डोही’ असे नाव असलेल्या या मुलाखतीतून दिवंगत नेते डॉ. शंकरराव चव्हाण कौटुंबिक आयुष्यात कसे होते? करड्या शिस्तीचे भोक्ते असलेल्या ‘नानां’च्या हदयाचा हळवा कोपरा कोणता होता? मुलांना आणि नातवंडांना त्यांनी काय शिकवण दिली, कोणते संस्कार दिले? अशा अनेक पैलूंवर प्रकाश पडणार आहे.
या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन स्व.डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी समारोह समिती तसेच आ. अमर राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत यांनी केले आहे.