घरदार, शेतांवर नांगर फिरवून विकास नको, नाणारमध्ये अशोक चव्हाणांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 02:48 PM2018-05-02T14:48:28+5:302018-05-02T14:48:28+5:30
घरदार आणि शेतांवर नांगर फिरवून विकास होणार असेल तर आसा विकास आम्हाला नको, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केला. यावेळी शिवसेनेच्या नाणारबाबतच्या भूमिकेवरही त्यांनी सडकून टीका केली.
नाणार (रत्नागिरी) - घरदार आणि शेतांवर नांगर फिरवून विकास होणार असेल तर आसा विकास आम्हाला नको, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केला. यावेळी शिवसेनेच्या नाणारबाबतच्या भूमिकेवरही त्यांनी सडकून टीका केली.
नाणार येथे काँग्रेसने आयोजित केलेल्या सभेत अशोक चव्हाण म्हणाले, नाणारमध्ये राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सरकारकडून इंग्रजांपेक्षा जास्त दंडेलशाही सुरू आहे. घरदार आणि शेतांवर नांगर फिरवून विकास होणार असेल तर आसा विकास आम्हाला नको."
नाणारबाबत शिवसेना आणि भाजपाचा वरून कीर्तन आणि आतून तमाशा असे नाटक सुरू असल्याचा टोलही त्यांनी लगावला, ते म्हणाले,"अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार मंत्र्यांना नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगून शिवसेनेला तोंडघशी पाडले. सत्तेमध्ये शिवसेनेची अवस्था एवढी वाईट झाली असतानाही शिवसेना सत्तेत आहे. खरंतर अधिसूचना रद्द करायला १० मिनिटे लागतात. मात्र सुभाष देसाई घोषणा करून १० दिवस उलटल्यानंतरही अद्याप अधिसूचना रद्द झालेली नाही."
गुजराती लोकांच्या सत्ताधाऱ्यांशी असलेल्या साट्यालोट्यावरही चव्हाण यांनी टीका केली. "सत्ताधारी पक्षाचे लोक दलाली खाऊन गुजराती लोकांना जमिनी मिळवून देत आहेत. मात्र काँग्रेस पक्ष नाणारवासीयांसोबत मिळून हा लढा लढणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेस पक्ष लोकांसोबत राहणार आहे. या रिफायनरीच्या माध्यमातून कोकण उध्वस्त करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. पण कोकणी जनता हे सरकार उद्ध्वस्त करेल, असे अशोक चव्हाण म्हणाले.