मुंबई - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाने राज्यभरात ५८ मोर्चे काढले होते. त्यांच्या आंदोलनाला आणि संघर्षाला आज यश आले असून आज विधीमंडळात एक मताने मराठा आरक्षण कायदा मंजूर झाला. यासाठी मी मराठा समाजाचे अभिनंदन करतो. काँग्रेस सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णय घेतला होता. या निर्णयावर आज शिक्कामोर्तब झाले, याचा आपल्याला अभिमान आहे. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
विधानभवनात पत्रकारांशी बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, काँग्रेस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले गेले. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले व सत्तेत आलेल्या भाजप शिवसेना सरकारने मागासवर्ग आयोगाचे गठन करणे, न्यायालयात कागदपत्रे सादर करणे अशा प्रक्रियांमध्ये वेळकाढूपणा केला. त्यामुळे राज्यातील समस्त मराठा समाज रस्त्यावर उतरला. जगाच्या इतिहासात नोंद होईल असे लाखोंचे मोर्चे निघाले तरीही सरकारने दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ४० तरूणांनी आरक्षणासाठी आपले बलिदान दिले.
मराठा समाजातील असंतोषाचा भडका उडाल्यावर व त्याचे चटके बसायला लागल्यावर सरकारने मराठा आरक्षण पुर्नस्थापित करण्यासाठी कार्यवाही सुरु केली आणि आज मराठा आरक्षणाचे विधेयक विधिमंडळात मांडले. मुळात मराठा आरक्षणाचा निर्णय काँग्रेस सरकारचा होता. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला आणि आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा होता. त्यासाठीच काँग्रेस पक्ष सरकारकडे पाठपुरावा करत होता.
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा काँग्रेस आघाडी सरकारचा निर्णय आज पूर्णत्वास गेला, याचा आम्हाला नक्कीच आनंद आहे. त्यामुळे मराठा समाजाने नक्कीच जल्लोष केला पाहिजे. आज जेवढा आनंद मराठा समाजाला झाला आहे, तेवढाच आनंद काँग्रेसला आहे. कारण काँग्रेस आघाडी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयावर आज विधीमंडळात शिक्कामोर्तब झाले आहे. मराठा समाजाच्या आनंदोत्सावात आम्हीही सहभागी आहोत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.