देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात महाराष्ट्र खड्ड्यात, अशोक चव्हाण यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 07:35 PM2018-10-29T19:35:45+5:302018-10-29T19:38:24+5:30
संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते तेच कळत नाही. देवेंद्र फडणवीसांच्या राज्यात महाराष्ट्र खड्ड्यात गेला आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
परभणी - संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते तेच कळत नाही. देवेंद्र फडणवीसांच्या राज्यात महाराष्ट्र खड्ड्यात गेला आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनंघर्ष यात्रेच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला आहे व सध्या ते जनसंघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा व दुष्काळ पाहणी दौ-यासाठी मराठवाड्याच्या दौ-यावर आहेत. आज परभणी जिल्ह्यातील पाथरी येथून जनसंघर्ष सभा आटोपून सेलूच्या दिशेने जात असताना त्यांनी व त्यांच्यासोबत जनसंघर्ष यात्रेत सहभागी नेत्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खड्डा, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील खड्डा असे नामकरण करून खड्ड्यात त्यांच्या नावाचे फलक लावले.
यावेळी बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, या संपूर्ण भागात रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. गावखेड्यापासून शहरांपर्यंत सगळ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील वारंवार खड्डेमुक्तीच्या तारखा जाहीर करतात पण राज्यातील रस्त्यावरील खड्डे कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. खड्डे मुक्तीसाठी कोट्यावधी रूपये खर्च केले जात आहेत पण खड्डे तसेच आहेत. राज्य महामार्ग असो किंवा राष्ट्रीय महाराष्ट्र असो सगळीकडे परिस्थिती सारखीच आहे. देवेंद्र फडणवीसांच्या राज्यात संपूर्ण महाराष्ट्र खड्डयात गेला आहे, अशी टीका खा. चव्हाण यांनी केली.