निवडणुका आल्याने वारी आठवली, अशोक चव्हाण यांची शहा यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 06:01 AM2018-07-09T06:01:50+5:302018-07-09T06:02:08+5:30

निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे आता भाजपाध्यक्ष अमित शहा सगळीकडे हिंडू लागतील. आज वारीत आले उद्या आणखी कुठे दिसतील.

 Ashok Chavan criticized Shah | निवडणुका आल्याने वारी आठवली, अशोक चव्हाण यांची शहा यांच्यावर टीका

निवडणुका आल्याने वारी आठवली, अशोक चव्हाण यांची शहा यांच्यावर टीका

Next

मुंबई - निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे आता भाजपाध्यक्ष अमित शहा सगळीकडे हिंडू लागतील. आज वारीत आले उद्या आणखी कुठे दिसतील. वारी आणि पांडुरंग आमच्यासाठी आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. निवडणूक आणि मतांच्या राजकारणासाठी अशी धावाधाव आम्ही करत नाही, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात लगावला.
मेळाव्याला राज्यातील महत्त्वाचे नेते, पदाधिकारी, आजी-माजी आमदार, खासदार आवर्जून उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, शिवाजीराव पाटील-निलंगेकर उपस्थित होते. प्रास्ताविकात अशोक चव्हाण म्हणाले की, जनता आॅनलाइन झाली असली, तरी सरकार मात्र आॅफलाइन झाले आहे. चार वर्षांच्या अपयशी कारभारानंतर भाजपाला आणीबाणीची आठवण झाली. मात्र, याच आणीबाणीनंतर १५ वर्षे राज्यात काँग्रेसचे सरकार होते, याचा भाजपाला विसर पडला आहे. चार वर्षांत मोदी सरकारने फक्त पोकळ आश्वासने दिली. त्यांनी काम केले नाही, म्हणून आपोआप आपले सरकार येणार नाही. त्यासाठी नेते, कार्यकर्त्यांना झपाटून काम करावे लागेल. देशाची चार वर्षांची बरबादी थांबविण्यासाठी सर्वांनी एकदिलाने, एकोप्याने काम करायला हवे, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदेश कॉँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले.
आणीबाणीचा काळ दलितांना वरदान - शिंदे
आणीबाणीच्या मुद्द्यावरून होणारी टीका अनाठायी आहे. याच आणीबाणीमुळे दलित व आदिवासींच्या विकासाला चालना मिळाली, हे सत्य विसरता येणार नाही. हरिजन, गिरीजन, वंचित समाजाला विकासाच्या संधी येथून मिळू लागल्या. ज्या बँका दारातही उभे करायच्या नाहीत, तेथे दलित, आदिवासींना कर्जे मिळू लागली, हे वास्तव आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

रस्त्यावर उतरावे लागेल - पृथ्वीराज चव्हाण

देशात आणि राज्यातील सरकारचा साराच कारभार भोंगळ बनला आहे. समाजातील प्रत्येक घटक त्रस्त झाला आहे. ही परिस्थिती बदलायची असेल, तर काँग्रेसला मतभेद विसरावे लागतील. पक्षातील विस्कळीतपणा दूर करून जनतेच्या प्रश्नांवर नेते आणि कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल.

Web Title:  Ashok Chavan criticized Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.