नांदेड ( भोकर ) : महाविकास आघाडीच सरकार कधीही कोसळू शकते, असा दावा भाजपच्या नेत्यांकडून सतत करण्यात येत आहे. तर याच मुद्यावरून सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपला खोचक टोला लगावला असून, राज्यात नव्याने अस्तित्वात आलेले सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीनुसारच चालणार असल्याने ते पाचच काय पुढील 15 वर्षे चालेल, असे चव्हाण म्हणाले.
अशोकराव चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाममंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच भोकर या होमपीचवर आगमन झाल्याचे औचित्य साधून भोकरकरांनी मोंढा मैदान येथे अशोकराव चव्हाण व माजी आमदार अमिता चव्हाण यांचा नागरी सत्कार केला.यावेळी ते बोलत होते.
राज्यातील पूर्वीच्या भाजप सरकारने 5 वर्षात मराठवाड्याला काहीच मिळू दिले नाही, मराठवाड्याचा अनुशेष भरला नाही, याचा उल्लेख करत 'उपरवाला जब देता है, छप्पर फाड के देता है' असे म्हणत नांदेड जिल्ह्याला अन मराठवाड्याला सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद मिळाले असल्यामुळे जिल्ह्यासह मराठवाड्याचा विकास करणार असल्याचे चव्हाण म्हणाले.
तर बारामतीवाले बारामतीला झुकते माप देवू शकतात तर मी नांदेडसह मराठवाड्याला का देवू शकणार नाही. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर 2 बैठकांतच 50 विविध विकासकामांना चालना देवून आलो असल्याचे सुद्धा यावेळी अशोक चव्हाण म्हणाले.