मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना सत्तेची धुंदी चढल्याने त्यांना राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि दुष्काळ दिसला नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना केली.‘गेल्या वर्षी मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळ नसतानाही सरकारने मदत वाटली’ असे वक्तव्य दानवे यांनी केले होते. त्यावर खा. चव्हाण म्हणाले, राज्यात पाच हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरून संघर्ष केल्यानंतर सरकारने दुष्काळग्रस्तांना ४२०० कोटींची तुटपुंजी मदत केली. काँग्रेस पक्षाला या मदतीचे श्रेय मिळू नये म्हणून असे वक्तव्य करणे दुर्दैवी असून, दानवेंमुळे भाजपाचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे.काही दिवसांपूर्वी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या बुलडाणा जिल्ह्यात एका शेतकऱ्याने फुंडकराच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. त्याच जिल्ह्यातील एका जाहीर सभेत बोलताना दानवे यांनी केलेले हे वक्तव्य म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असून, त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. या असंवेदनशील वक्तव्याबाबत दानवे यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणीही खा. चव्हाण यांनी केली.
दानवेंना चढली सत्तेची धुंदी - अशोक चव्हाण
By admin | Published: January 24, 2017 4:23 AM