BJP MP Ashok Chavan News: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभेच्या यशानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला असून, विधानसभेत त्याच विजयाची पुनरावृत्ती करण्याचा मानस बोलून दाखवला जात आहे. तर महायुती महाविकास आघाडीला चितपट करण्यासाठी कंबर कसून तयारीला लागली आहे. यातच आता काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले आणि थेट राज्यसभेची खासदारकी मिळालेले अशोक चव्हाण यांच्या मुलीला भाजपाकडून तिकीट मिळण्याबाबत काही दावे केले जात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. यावर अशोक चव्हाण यांनी स्पष्ट शब्दांत थेट भाष्य केले आहे.
भाजपामध्ये आल्यानंतर किंवा काँग्रेसमध्ये असताना पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम केले. भाजपामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. महायुतीचा उमेदवारांनी विजयी करण्याचे लक्ष्य माझ्यापुढे आहे. पक्षाने नांदेड आणि हिंगोलीची जबाबदारी दिली आहे. याशिवाय अन्य जिल्ह्यात सभा होणार आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
मी तिच्याबरोबर असेन
अशोक चव्हाण यांना त्यांची कन्या श्रीजया यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, पक्ष जे ठरवेल त्यानुसार काम करण्याची आमची भूमिका आहे. माझी मुलगी श्रीजया सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. ती राजकारणातही सक्रीय आहे. भाजपाच्या अनेक सभांना हजर असते. तिची इच्छा असेल, तर तिने पक्षाकडे तिकिटाची मागणी करावी, पण तिच्या तिकिटासाठी प्रयत्न करणार नाही. तिने स्वत: त्यासाठी प्रयत्न करावेत. मी तिच्याबरोबर असेन, असे अशोक चव्हाण म्हणाले.
तिने राजकारणात यावे, अशी वडील म्हणून इच्छा आहे
तिने राजकारणात यावे, अशी वडील म्हणून इच्छा आहे. श्रीजयाने स्वत:च्या भविष्याचा निर्णय घ्यावा, तिला कुठून तिकीट द्यावे, हा पक्षाचा विषय आहे. त्यात कुठेही हस्तक्षेप करणार नाही. मागच्या काही वर्षांपासून मतदारसंघात काम करत आहे. पडद्यामागून अनेक निवडणुकीत माझे काम केले आहे. वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आहे. सुशिक्षित आहे. इच्छा असेल तर तिने निवडणूक लढावावी, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. ते एबीपीशी बोलत होते.