ऑनलाइन लोकमतभिवंडी दि 22 : भिवंडी महानगरपालिकेचे सभागृह नेता मनोज म्हात्रे यांची ज्या निर्घुणपणे हत्या केली हे कृत्य महाराष्ट्राला काळीमा फासणारे असुन पोलीसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्षपातीपणे तपास केला पाहिजे.आमचा पोलीस यंत्रणेवर विश्वास आहे.त्यांनी म्हात्रे कुटूंबीयांना न्याय मिळवून दिला पाहिजे.म्हात्रे यांच्या निधनाने भिवंडी काँग्रेस पक्षाचे व येथील सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व हरपले आहे.येत्या अधिवेशनात या प्रकरणी आम्ही चर्चा घडवून आणणार आहोत,अशी माहिती काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भिवंडीत दिली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भिवंडीतील अंजूरफाटा समृध्दी अपार्टमेंट येथे स्व.मनोज म्हात्रे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटूंबीयांची भेट घेतली आइण त्यांचे सांत्वन केले.यावेळी त्यांनी म्हात्रे यांच्या पत्नी वैशाली व मुलगी हर्षाली यांच्यासोबत एकांतात चर्चा केली.तसेच पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांच्याक़डून पुढील तपासाबाबत माहिती घेतली.तसेच म्हात्रे कुटूंबीयांना पोलीस संरक्षण द्यावे असे त्यांनी सांगीतले. नऊ दिवस उलटूनही मुख्य आरोपीस पोलीसांनी अटक न केल्याने कार्यकर्त्यांनी या वेळी संताप व्यक्त केला.या वेळी माजी खासदार सुरेश टावरे,दामु बारकू शिंगडा,माजी आमदार रशीद ताहीर,योगेश पाटील,शहराध्यक्ष शोएब खान,इम्रान खान यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते