मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत येण्यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी आपले दरवाजे बंद असल्याचे म्हटले आहे. परंतु वंचित आघाडीसोबत युतीच्या चर्चेसाठी आपण शेवटपर्यंत तयार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
गांधीभवन येथील लोकसभा निवडणुकीसंदर्भात आयोजित बैठकीपूर्वी ते बोलत होते. यावेळी अशोक चव्हाण यांनी नगरच्या जागेसंदर्भात आपले मत मांडले. तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार आपल्याला नसल्याचे म्हटले आहे.
सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसमध्ये अंसतोष आहे. त्यामुळे विखे पाटलांना विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा मागितला जाणार का, असे विचारण्यात आले. त्यावर चव्हाण म्हणाले, मला राजीनामा मागण्याचा अधिकार नाही. तसेच त्यांना अद्यापपर्यंत कोणीही राजीनामा मागितला नाही. नगरच्या जागेची आमची मागणी होती. ती पूर्ण होऊ शकली नाही. परंतु त्याचा आघाडीवर परिणाम होणार नसल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.
चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्यासंदर्भात आपले मत मांडले. प्रकाश आंबेडकरांनी युतीच्या चर्चेसाठी दरवाजे बंद झाल्याचे म्हटले आहे. तरी देखील आम्ही शेवटपर्यंत युतीच्या चर्चेसाठी तयार असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. यावेळी नागपूर मतदार संघातील नाना पटोले यांच्या उमेदवारी संदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले की, नितीन गडकरी यांच्याविरुद्ध काँग्रेसचाच विजय होईल.