नांदेड : केंद्रीय कृषीमंत्री राधामोहनसिंह यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात केलेले विधान संतापजनक असून केंद्रातील असंवेदनशील शासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, असे टीकास्त्र माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी मांडली़.राधामोहनसिंह यांच्या विधानाचा काँग्रेसतर्फे निषेध करण्यात येत असून सभागृहातही त्याचा जाब विचारणार असल्याचे चव्हाण यांनी पत्रपरिषदेत सांगितले. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या गंभीर विषय आहे़ त्यांना दिलासा देण्याऐवजी केंद्रीय कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या आत्महत्या या प्रेमप्रकरण, व्यसनाधिनता यामुळे होतात, असे विधान करतात़ केंद्रीय अहवालानुसार सर्वात जास्त २,५०० पेक्षाही अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत़ मात्र सभागृहात हा आकडा फक्त तीन सांगण्यात आला़ त्यावर मी सत्ताधाऱ्यांना अभ्यास करण्याचा सल्ला दिला होता़ शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे़ त्यासाठी आंदोलनेही केली़, परंतु शासनाने मात्र अद्यापही दखल घेतलेली नाही, असेही ते म्हणाले.आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळावा म्हणून कर्जमाफी द्यावी आणि त्यानंतर दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी आमची भूमिका आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी देणारच नसल्याचे सांगितले़ यावरुन सरकारचा दृष्टिकोन असंवेदनशील असल्याचे दिसते़ त्याबाबत सभागृहात जाब विचारणार असल्याचेही ते म्हणाले़शेतीमालाला उत्पादन खर्चावर भाव, कर्जमाफी आदींबाबत निवडणुकीच्या तोंडावर आश्वासने देण्यात आली़ धनगर आरक्षणाच्या मुद्याचाही सरकारला विसर पडला आहे़, परंतु आश्वासनांची त्यांना वेळोवेळी आठवण करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)कृत्रिम पाऊस पाडण्याच्या संदर्भात हालचाली सुरु असून त्यातून नांदेड जिल्हा वगळणार असल्याची माहिती आहे़ प्रत्यक्षात संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ आहे़ त्यामुळे दुष्काळाच्या संदर्भात तरी मराठवाड्यात असा भेदभाव करु नका़ सर्वच जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग करावा, अशी मागणीही शासनाकडे करणार असल्याचे खा़ चव्हाण म्हणाले़. अगोदर राजीनामे नंतर चर्चाचर्चेविना संसदेचे कामकाज ठप्प असल्याच्या मुद्यावर खा़ चव्हाण म्हणाले, भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांनी अगोदर राजीनामे द्यावेत. त्यानंतर आम्ही चर्चेला तयार आहोत़ राजीनामे न देता आम्ही चर्चा करणे हे त्यांचे समर्थनच ठरेल़ काँग्रेसच्या काळात फक्त आरोपांवरुन अनेकांना राजीनामे द्यावे लागले होते़
शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले- अशोक चव्हाण
By admin | Published: July 26, 2015 2:02 AM