जालना:महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद अधूनमधून चव्हाट्यावर येत असल्याचे यापूर्वीही दिसून आले आहे. महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) सरकार स्थापन झाल्यापासून काही ना काही कुरबुरी समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नवीन वाद पेटण्याची चिन्हे असल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा वाटा मोठा आहे. आम्ही आहोत म्हणून महाविकास आघाडीची सत्ता आहे, असा पुनरुच्चार अशोक चव्हाण यांनी केला आहे.
जालना जिल्ह्यातील मंठा नगरपंचायतीच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण आले होते. एका प्रचारसभेत ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा असून, हे सरकार मजबूत राहिले पाहिजे, हीच आमची प्रमाणिक भूमिका आहे, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीचा विचारपूर्वक निर्णय आपण घेतला
लोकांचा जीव वाचवला पाहिजे, यासाठी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मेहनत घेण्यात आली. या सर्व कामांवर लक्ष एकत्रित करुन राज्याच्या विकासाचा गाडा पुढे चालत राहिला पाहिजे या अनुषंगाने महाविकास आघाडीने निश्चित प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा आहे. आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे हे मुद्दाम सांगितले पाहिजे. काँग्रेसच्या ताकदीनेच या महाविकास आघाडीचा विचारपूर्वक निर्णय आपण घेतला, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
त्या निर्णयाने आमची सर्वांचीच निराशा
ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयान जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाने आमची सर्वांचीच निराशा झाली. भाजपला देशातील, राज्यातील आरक्षण संपून टाकायचे आहे. त्यामुळेच भाजप असहकार्याची भूमिका दाखवत आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत केंद्र सरकारने योग्य भूमिका घेतली नाही. केंद्र सरकारने ५० टक्क्यांची अट न काढता अधिकार राज्यांना दिले. त्यांनी कायद्यात बदल केला नाही. संसदेत कायदा केला असता तर मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागला असता. मात्र, केंद्र सरकारला ५० टक्क्यांच्या वर आरक्षण द्यायचेच नाही, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला.