अशोक चव्हाणांच्या रूपाने काँग्रेसला मराठवाड्यात बळकटी!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 12:17 PM2019-12-31T12:17:55+5:302019-12-31T12:28:15+5:30
अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्र विधिमंडळात विविध खात्याचे मंत्रीपद भूषवत दोनवेळा मुख्यमंत्रीपदाच्या रूपाने राज्याचे नेतृत्वही केले आहे.
मुंबई: माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सोमवारी मुंबई येथे कॅबिनेट मंत्रिपदाची सातव्यावेळी शपथ घेतली. हे वृत्त समजताच नांदेड शहरासह जिल्ह्यातील विविध भागात काँग्रेससह महाआघाडीच्या कार्यकत्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला. अशोकराव चव्हाण यांच्या मंत्रिपदामुळे नांदेडसह मराठ्याङ्यातील काँग्रेसचा गड आता आणखीनच भक्कम होणार आहे. दरम्यान, चव्हाण यांना कोणते खाते मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्र विधिमंडळात विविध खात्याचे मंत्रीपद भूषवत दोनवेळा मुख्यमंत्रीपदाच्या रूपाने राज्याचे नेतृत्वही केले आहे. या काळात त्यांनी मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला वाढवण्याचे काम केले. विशेष म्हणजे विरोधी पक्षात असताना सुद्धा नांदेड जिल्ह्यात काँग्रेसने बहुतांश निवडणुकांमध्ये वर्चस्व राखल्याचे पाहायला मिळाले होते.
२०१४ मध्ये राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर काँग्रेसला गळती लागली होती. या काळात स्थानिक संस्था सुद्धा भाजप-शिवसेनेच्या ताब्यात जात होत्या. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना सांभाळने काँग्रेससमोर मोठे आव्हान होते. मराठवाड्यात सुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती. अशात लातूरमध्ये देशमुख कुटुंब आणि नांदेडला चव्हाण यांनी काँग्रेसला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र मराठवाड्यात इतर ठिकाणी काँग्रेसला घरघर लागली असल्याचे पाहायला मिळाले.
अशोक चव्हाण यांचा राजकीय अनुभव पाहता आता मराठवाड्यात काँग्रेसला चांगले दिवस येणार असल्याचे बोलले जात आहे. चव्हाण यांना मंत्रीपद मिळाल्याने मराठवाड्यात काँग्रेस दबदबा वाढणार असल्याची चर्चा आहे. तसेच काँग्रेसमधील तळागाळातील कार्यकर्त्यांनाही मोठा आधार मिळणार आहे.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाली. ही नांदेडसह मराठवाड्यासाठी सुवर्णसंधी आहे. मागील पाच वर्षात भाजपा नेतृत्वाखालील सरकारने नांदेडसह मराठवाड्याच्या विकासाला खीळ बसविण्याचे काम केले. विकास कामाऐवजी केवळ थापा मारण्यात धन्यता मानल्याने राज्यात महाआघाडीचे सरकार आले. मराठवाड्यातील एक ज्येष्ठ प्रतिनिधी म्हणून मराठवाड्याचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. - अशोक चव्हाण ( कॅबिनेट मंत्री )