ईडीनं पुन्हा उघडली 'आदर्श'ची फाईल; शपथविधीआधी अशोक चव्हाणांना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 11:21 AM2019-11-28T11:21:11+5:302019-11-28T11:39:16+5:30
आदर्श सोसायटी प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरू
मुंबई: भाजपाला दूर ठेवण्यासाठी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले. या तीन पक्षांनी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करत भाजपाला जोरदार दणका दिला. मात्र आता केंद्र सरकारनं राज्यात स्थापन होणाऱ्या सरकारला पहिला धक्का दिला आहे. अंमलबजावणी संचलनालयानं (ईडी) आदर्श सोसायटी घोटाळ्याची चौकशी पुन्हा एकदा सुरू केली आहे. आदर्श प्रकरणात नाव आल्यानं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचं मुख्यमंत्रीपद गेलं होतं. आता अशोक चव्हाण महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याची दाट शक्यता असताना ईडीनं आदर्श प्रकरणाची फाईल उघडली आहे.
शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्याचवेळी अशोक चव्हाणदेखील मंत्रिपदाची शपथ घेण्याची दाट शक्यता आहे. मात्र त्याआधीच ईडीनं आदर्श सोसायटी प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू केली आहे. याच प्रकरणामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. या प्रकरणात चव्हाणांविरोधीत खटला चालवण्याची परवानगी राज्यपालांनी दिली होती. मात्र न्यायालयानं त्यांचा आदेश रद्दबातल ठरवला होता.
दक्षिण मुंबईच्या कुलाब्यात युद्धातील शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी आदर्श इमारत उभी करण्यात आली. मात्र या इमारतीत अनेक नोकरशहा आणि संरक्षण अधिकाऱ्यांना घरं देण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं चौकशी सुरू केल्यानंतर त्यात अशोक चव्हाण यांचं नाव पुढे आलं. त्यामुळे त्यांच्यावर राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली. या प्रकरणात चव्हाण यांच्यासोबतच अनेक वरिष्ठ नेत्यांची नावंदेखील पुढे आली होती.