मुंबई : महाविकास आघाडीचा महामोर्चा (Mahavikas Aghadi) उद्या मुंबईत काढण्यात येणार आहे. महापुरुषांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून हा मोर्चा काढून भाजप आणि सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा असणार आहे. मात्र, उद्या काढण्यात येणाऱ्या महामोर्चाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण गैरहजर राहणार आहेत.
एका निकटवर्तीय कुटुंबातील नांदेड येथे पूर्वनियोजित विवाह सोहळ्यामुळे मला मोर्चात सहभागी होणे शक्य नाही, असे कारण सांगत माझ्याऐवजी माझी पत्नी अमिता चव्हाण या महामोर्चात सहभागी होतील, असे अशोक चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. "महाविकास आघाडीच्या १७ डिसेंबर रोजी नियोजित मोर्चाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र एका निकटवर्तीय कुटुंबातील नांदेड येथे पूर्वनियोजित विवाह सोहळ्यामुळे मला मोर्चात सहभागी होणे शक्य नाही. माजी आमदार सौ. अमिता चव्हाण तिथे उपस्थित राहतील. कृपया वस्तुस्थितीची नोंद घ्यावी", असे ट्विट अशोक चव्हाण यांनी केले आहे.
दरम्यान, महापुरुषांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून हा मोर्चा काढून भाजप आणि सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा असणार आहे. 'महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल' या घोषवाक्याखाली महाविकास आघाडी शनिवारी रस्त्यावर उतरत आहे. यासाठी शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. भायखळ्याच्या रिर्चड्सन क्रुडासपासून सकाळी ११ वाजता या मोर्चाला सुरुवात होईल, त्यानंतर हा मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने येणार आहे.
महामोर्चात कोण-कोण सहभागी होणार?शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे, अरविंद सावंत आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच, काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप आणि इतर नेते उपस्थित असतील. तर राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षातील काही नेते उपस्थित असणार आहेत. याशिवाय, मविआच्या मोर्चाला डाव्या पक्षांचा देखील पाठिंबा असणार आहे.