विठ्ठल फुलारीसंपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या नांदेड जिल्ह्यातील भोकर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांचे नेतृत्व मान्य करत भोकरच्या जनतेने पुन्हा एकदा नगर परिषदेची सूत्रे काँग्रेसकडे सोपविली आहेत. चव्हाण यांचे नेतृत्व व भोकर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार अमिता चव्हाण यांचे मार्गदर्शन आणि विधान परिषदेचे सदस्य अमरनाथ राजूरकर यांच्या व्यूहरचनेमुळे काँग्रेसने पुन्हा एकदा विजय मिळविला. काँग्रेसला १२ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला ३, भाजपा व अपक्षांना २ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेला मात्र भोपळाही फोडता आला नाही. काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादीचे माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर, भाजपाचे डॉ. माधवराव किन्हाळकर यांच्यासह शिवसेनेच्या जिल्ह्यातील आमदार व इतर स्थानिक नेत्यांनी कंबर कसली होती. भोकरमधील विजयामुळे राज्यपातळीवर चव्हाण यांच्या नेतृत्वाला अधिक बळकटी मिळणार आहे. भोकर नगर परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असून, प्रभाग ४मधून अनुसूचित जमाती गटातून विजयी झालेले साहेबराव सोमेवाड यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. सोमेवाड हेच अध्यक्षपदाचे उमेदवार असतील, असे आ. अमिता चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
अशोक चव्हाण यांच्या भोकरमध्ये काँग्रेसच !
By admin | Published: April 24, 2015 1:32 AM