मालेगाव : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील 'केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र' या घोषणेची 'बाप-बेट्या'चे उदाहरण देत खिल्ली उडविली. यावेळी त्यांनी उदाहरणासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या वडिलांची गोष्ट सांगत 'बाप तसा बेटा', असल्याची टीका केली.
अशोक चव्हाण म्हणाले की, गावातील शाळेत दुपारची सुटी झाली होती. मुले आणि मास्तर झाडाच्या सावलीत जेवत होते. यावेळी एक विद्यार्थी मास्तरांच्या टेबलवर उभा राहून लघवी करत होता. मास्तरांनी हे कृत्य त्याच्या वडिलांना सांगण्याचे ठरविले आणि गावात गेले. यावेळी या विद्यार्थ्याच्या वडिलांनी यात नवल काय, मी छतावर उभा राहून लघवी करत असल्याचे मास्तरला सांगितले. अशीच स्थिती आज देशात आणि राज्यात झाली असल्याची टीका त्यांनी केली.
यानंतर अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्र भाजपच्या 'केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र' या घोषणेची खिल्ली उडवत विद्यार्थी आणि मास्तरच्या गोष्टीचा उल्लेख करत जनतेला आले दारिद्र्य, असे म्हटले.